Wednesday 27 October 2021

छोटा गोंडस गिनी पिग


मुलांनो, तुम्हाला गिनीपिग नावाच्या एका छोट्याशा प्राण्याबद्दल माहिती आहे का?  हा छोटा प्राणी खूपच गोंडस आहे. जरी त्याचे नाव पिगी म्हणजेच डुकराशी संबंधित असले तरी, त्याचा  जैविकदृष्ट्या डुकराशी  दुरान्वयेही संबंध नाही. गिनी पिग ससा वर्गातील प्राणी आहे. याला कॅव्ही किंवा घरगुती कॅव्ही या नावानेही ओळखले जाते. गिनी पेरू, इक्वेडोर आणि कोलंबिया देशांमध्ये राहणारे इंका आदिवासी समाजातील लोक फार पूर्वीपासून गिनी पिग पाळत ​​होते.  ते गिनी पिगला एक स्वादिष्ट अन्न मानत.

विशेष म्हणजे अमेरिकेचा शोध लागल्यानंतर लगेचच खाण्याच्या उद्देशाने गिनी पिगला युरोप खंडात आणले गेले. आता फक्त पेरूमधील काही स्थानिक लोक गिनी पिग खातात. पण आज दक्षिण अमेरिका आणि इतरत्र त्यांचा  पाळीव प्राणी म्हणून सांभाळ केला जातो. तिथले लोक गिनी पिग पाळीव प्राण्यांच्या दुकानातून खरेदी करतात.  गिनी पिगच्या शरीराची लांबी सुमारे 25 सेमी आणि वजन सुमारे एक किलोग्रॅम असते.  त्यांना शेपूट नसते. त्यांचे कान लहान, पण केस नसलेले आणि गोल असतात. त्यांच्या पुढच्या पायांना चार बोटे असतात आणि मागच्या पायांची तीन बोटांसारखी रचना आहे.  त्यांच्यावर नखेही असतात. गिनी पिग हा शाकाहारी प्राणी आहे. अन्न खाताना ते मागच्या पायावर बसतात. जंगलात मात्र ते बिळात राहतात. फक्त संध्याकाळी खाण्यासाठी बिळातून बाहेर पडतात. पाळीव प्राणी म्हणून सांभाळ करताना त्यांना वेळोवेळी अन्न आणि पाणी द्यावे लागते. मेडिकल सायन्सशी संबंधित संशोधनात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गिनी पिगचे आयुष्य साधारण आठ वर्षांचे असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment