Thursday 14 October 2021

रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य


हिंदू दिनदर्शिकेनुसार आज दसरा आहे. भगवान रामाने यादिवशी रावणाचा वध केला.आणि देवी दुर्गाने नऊ रात्री आणि दहा दिवसांनी महिषासुरावर विजय मिळवला होता.म्हणून हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून 'विजयादशमी' या नावानेही साजरा केला जातो.दहा डोके असल्याने रावणाला दशानन म्हटले जाते.पण तुम्हाला माहीत आहे का की रावणाला दहा डोकी कशी मिळाली आणि ते कशाचे प्रतिनिधित्व करतात? चला तर मग जाणून घेऊया रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य...

जेव्हा रावणास महादेव झाले प्रसन्न

 त्रिलोक विजेता रावण हा भगवान महादेवांचा परमभक्त होता. एकदा त्याने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. जेव्हा हजारो वर्षे रावणाच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत, तेव्हा निराश होऊन रावणाने भगवान शंकराला आपले मस्तक अर्पण करण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवाच्या भक्तीत लीन झालेल्या रावणाने भोलेनाथला आपले मस्तक अर्पण केले. पण तरीही रावणाचे प्राण गेले नाहीत. शीर अर्पण केल्यानंतर त्या जागी दुसरे डोके आले. असे करून रावणाने भगवान शंकराला तब्बल नऊ वेळा मस्तक अर्पण केले. जेव्हा रावणाला दहाव्या वेळेस आपले मस्तक शंकरास अर्पण करायचे होते, तेव्हा भगवान शिव स्वतः रावणावर प्रसन्न झाले आणि शिवाची कृपा मिळाल्यावर रावण तेव्हापासून दशानन बनला. या कारणामुळे रावण हा भगवान शिवचा परम भक्त मानला जातो.

वाईटाचे दहा डोके

विजयादशमीला रावणाचे पुतळे जाळण्याची परंपरा आहे. रावण हे अहंकाराचे प्रतीक आहे, रावण सत्ता आणि शक्तीचा गैरवापर करण्याचे प्रतीक आहे आणि रावण हे ईश्वरापासून विन्मुख होण्याचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, रावणाचे दहा डोके हे दहा वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत. रावणाचे दहा मस्तक काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अहंकाराचे प्रतीक मानले जाते. रावण देखील या नकारात्मक भावनांनी प्रभावित झाला आणि या कारणामुळे श्रीमंत आणि ज्ञानी असूनही त्याचा नाश झाला. वाल्मिकी रामायणानुसार रावण दहा डोके,  मोठी दाढ, तांब्यासारखे ओठ आणि वीस हात  घेऊन जन्माला आला होता. तो कोळशासारखा  काळा होता आणि त्याच्या दहा ग्रिव्हांमुळे त्याच्या वडिलांनी त्याचे नाव दशग्रीव ठेवले. या कारणामुळे रावण दशानन, दशकंधन नावाने प्रसिद्ध झाला. दहा मस्तके असल्याचा भ्रम रावण भगवान शिवाचा परमभक्त, त्याच्या दहा मायावी शक्तीसाठीदेखील ओळखला जातो.  अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे  की, रावणाचे दहा डोके होते हे फक्त भ्रम निर्माण  करण्यासाठी. कारण रावणाला दहा डोकी मुळात  दहा नव्हतीच. त्याच्या गळ्यात नऊ रत्नांचा हार होता असे म्हणतात. या पुष्पहारामुळे रावणाला दहा मस्तके असल्याचा भ्रम निर्माण होत असे. रत्नांची ही माला रावणाला त्याची आई कैकसीने दिली होती.


No comments:

Post a Comment