Saturday 1 May 2021

टाईम मशिन


माणूस हा काळाच्या सीमेत बांधलेला असतो. त्याला भूतकाळातही जात येत नाही की भविष्यकाळातही उडी मारता येत नाही. मात्र, असे करण्याची क्षमता त्याला मिळाली तर? पुराणकथांपासून ते विज्ञानकथांपर्यंत अनेक ठिकाणी या संकल्पनेचा विस्तार झालेला दिसून येतो. काही सिद्धयोगी आपल्या योगबळाच्या सहाय्याने असे करण्यास सक्षम होते असेही म्हटले जाते. अशी क्षमता माणसाला देणारे 'टाईम मशिन' बनवणे हे एक मोठेच आव्हान आहे.

तसेच ते वास्तवाला धरून आहे का असाही प्रश्न आहे. मात्र, जगभरातील अनेक सामान्य लोकांपासून ते संशोधकांपर्यंत अशा 'टाईम मशिन'चे आकर्षण व कुतुहल आहेच! अनेक ग्रहांचा स्वतःभोवती तसेच आपल्या ताऱ्याभोवती फिरण्याचा वेग वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक ग्रहावरील दिवस तसेच वर्षाचा कालावधी वेगवेगळा असतो. काही ग्रहांचे वर्ष अवघ्या काही तासांचे असू शकते तर काही ग्रहांचे वर्ष शेकडो वर्षांचेही असू शकते. त्यामुळे भारतीय पुराणकथांमध्ये अन्य ग्रहांवरील वर्षे व पृथ्वीवरील वर्षांमध्ये तफावत असल्याची जी वर्णने आहेत ती अगदीच काल्पनिक म्हणता येणार नाहीत. बलरामाची पत्नी रेवतीचे वडील रैवत हे सध्याच्या जुनागढ, गिरनार पर्वताच्या भागातील एक राजे होते. आपल्या मुलीला कोण योग्य पती ठरू शकतो हे खुद्द ब्रह्मदेवांना विचारण्यासाठी ते मुलीसह सत्यलोकात गेले. ब्रह्मदेवाचा एक दिवस हा पृथ्वीवरील एक हजार चतुर्युगांचा असतो तसेच एक रात्रही तितक्याच कालावधीची असते असे वर्णन गीतेसारख्या ग्रंथांमध्ये आहे. तिथे रैवत राजा मुलीसह काही वेळ राहून पृथ्वीवर परतला असता पृथ्वीवर हजारो वर्षे उलटून गेल्याचे त्यांना आढळून आले असे वर्णन आहे. त्यामुळे एका अर्थी रैवत राजा व रेवतीने फार मोठ्या अंतराच्या भविष्यकाळातच प्रवेश केला होता! आधी असे मानले जात होते की काळ हा निरपेक्ष आणि सार्वभौम आहे. याचा अर्थ सगळीकडे काळ हा समानच आहे. जर पृथ्वीवर सकाळचे दहा वाजले असले तरी मंगळावरही दहाच वाजले असतील का? हे पृथ्वीवरील वेगवेगळ्या देशांमध्येही शक्य नाही तर परग्रहांबाबत कसे शक्य असेल? आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताने हा समज दूर केला. आईन्स्टाईनने म्हटले होते की दोन घटनांमधील मोजलेला काळ हा पाहणारा कोणत्या गतीने जात आहे यावर निर्भर असतो. काही अवकाशीय किरणे प्रकाशाच्या गतीने जातात. त्यांना एक आकाशगंगा पार करण्यासाठी काही क्षणही लागू शकतात. मात्र, पृथ्वीवरील काळाच्या हिशेबात यासाठी हजारो वर्षे गेलेली असू शकतात. 'टाईम मशिन'ची संकल्पना तर यापेक्षाही अनोखी आहे. या मशिनच्या सहाय्याने हव्या त्या वेळी भूतकाळात आणि भविष्यकाळात जाण्याचे स्वप्न माणूस पाहत आहे. अर्थातच 'डोरेमॉन'च्या टाईम मशिनमधून हव्या त्या वेळी मित्रांसह पूर्वीच्या डायनासोरच्या काळात किंवा भविष्यातील आपल्या नातवंडांच्या काळात जाऊन येणाऱ्या नोबितासारखे हे सहजशक्य नाही!


No comments:

Post a Comment