Saturday 11 February 2023

पळसाचे झाड

उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडेच उरतात. अशा या नजर भाजणाऱ्या उन्हात बहरणारी झाडे तशी मोजकीच असतात. या दिवसांत पळस आपले लक्ष वेधून घेतो. पळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते. पाश्चात्त्य राष्ट्रांत पळस आढळत नाही. ‘बुटिया मोनोस्पर्मा’ हे पळसाचे वनस्पतिशास्त्रीय नाव. त्यातील ‘मोनोस्पर्मा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ एक बीज असणारा. पळसाला संस्कृतमध्ये ‘पलाश’ असे म्हणतात. ‘पल’ म्हणजे मांस आणि ‘अश’ म्हणजे खाणे. याचाच अर्थ असा, की पलाश म्हणजे मांस भक्षण करणारा वृक्ष. जमिनीवर पडलेल्या लालभडक पळसफुलांना युद्धभूमीवरील रक्तमांसाच्या सडय़ाची उपमा दिल्याचे उल्लेखही प्राचीन साहित्यात आढळतात.

पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि १२ ते १५ मीटर उंचीचे असते. त्याची वाढ अतिशय मंद होते. वर्षभरात पळसवृक्ष जेमतेम एक फूटच काय तो वाढतो. त्याचे खोड खडबडीत असते आणि पाने आकाराने मोठी व गोल असतात. पाने एका डहाळीवर तीनच्या संख्येत असतात. (‘पळसाला पाने तीन’ ही म्हण त्यावरूनच आली असावी.) पळसाला चपटय़ा शेंगा येतात. त्यांना ‘पळसपापडी’ म्हणतात. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. तसे पाहिले तर, पळसफुले ही जशी लालभडक असतात, तशीच ती पिवळी आणि पांढरीही असतात. 

पळसफुले दिसायला अतिशय आकर्षक असली तरी झाड मात्र अनाकर्षक असते. आंबा आणि चिंचेचा आकार कसा डेरेदार असतो; पळस मात्र आकारहीन असतो. पळसाच्या झाडाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या फुलांनाही गंध नाही. पळस फुलतो तेव्हा देशोदेशीचे पक्षी पळसवनात येतात आणि किलबिलाट करीत पळसाच्या झाडावर उतरतात. पळसाच्या फुलांत बराच मध असतो. तो ते प्राशन करतात. याच मधासाठी नंतर मधमाश्याही येतात. मधमाश्यांच्या गुंजारवाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे हा अनाकर्षक पळस जणू काही ‘गाणारे झाड’च होऊन जातो.

पळसाची झाडे मनुष्यवस्तीचा अभाव असलेल्या मोकळ्या माळरानावर ती आवर्जून दिसतात. जंगलातील जमिनीचा कस कमी होऊ लागला, की पळसाचे प्रमाण वाढते. पळस हे निकृष्ट जमिनीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात पळस बऱ्यापैकी आढळत असला तरी मध्यप्रदेशात मोठी पळसबने आहेत. पळसाचे झाड फाल्गुन महिन्याच्या आरंभापासूनच बहरू लागते. चैत्रात तर झाडाची सर्व पाने गळून पडतात आणि त्याची जागा फुले घेतात. लालभडक फुलांनी डंवरलेला हा पळसवृक्ष मग पेटल्यासारखा दिसू लागतो. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. जणू चैत्रारंभी हा अग्नी लालभडक फुलांच्या रूपाने बाहेर पडत असतो. 

प्राचीन संस्कृत साहित्यात आणि धर्मग्रंथांतही पळसाचे अनेक संदर्भ आढळतात. ‘लिंग पुराणा’त पळसाचा उल्लेख ‘ब्रह्मवृक्ष’ असा केला आहे आणि त्याची तीन पाने ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकराचे प्रतिनिधित्व करतात, असेही म्हटले आहे. प्राचीन आणि आधुनिक साहित्यात वारंवार आढळणारा हा पळस लोकव्यवहारातही अतिशय उपयुक्त आहे. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. त्यामुळे यज्ञविधीत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी पळसाच्या समीधा वापरतात. आयुर्वेदानुसार पळसाच्या बियांचे चूर्ण अतिसारावर उपयुक्त असते आणि वाजीकरणाच्या औषधातही पळसाचा वापर होतो. पळसाच्या पत्रावळीत केलेले भोजन चांदीच्या पात्रात केलेल्या भोजनाइतकेच आरोग्यदायी असते. पळसफुलांपासून रंग तयार करतात आणि तो रंग आदिवासी होळीच्या सणात वापरतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment