Tuesday 14 February 2023

द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के

देशात निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल आहे. राज्यातील द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के इतका असून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनांपैकी केवळ आठ टक्के माल निर्यात होतो. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्य द्राक्ष बागाईतदार संघ सातत्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. शिवाय अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकसनासाठी कार्य करत आहे. मांजरी फार्म (ता. हवेली) येथील प्रयोगशाळेत द्राक्षाचे नवे वाण विकसित केले आहे. नवे वाण विकसित करण्यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने संशोधन करण्यात येत होते.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, चव, चांगली वजनदार आणि सुवासिक द्राक्षे प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघाला यश आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरणात या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोग करण्यासाठी भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना या नव्या वाणाची रोपे दिली होती. या सर्व शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चांगले निष्कर्ष निघाले आहेत. या चाचणीवेळी प्राप्त झालेल्या सूचनांचा अभ्यास करून, या वाणात आणखी काही सुधारणा करता येतील, हे तपासले जाणार आहे.  या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती ‘क्रिमसन’ प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. या झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल.

No comments:

Post a Comment