Tuesday 14 February 2023

सांगलीच्या स्मृती मानधनाने मारली बाजी

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना हिला पहिल्या वुमन्स प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागली आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तिच्यावर फ्रेंचायसींनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू संघाने 3.40 कोटींची बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

स्मृती मानधनाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तिच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर तिला इतकी मोठी किंमत मिळाली आहे. स्मृती मानधना ही जगातील टी-20 क्रिकेट मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्मृती मानधना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन यांना आपला आदर्श मानते.

स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या महिला बिग बॅश लीगमध्ये 38 सामन्यांमध्ये 784 धावा केल्या आहेत. 139 च्या स्ट्राईक रेटने मानधनाने धावा केल्यात. इतकेच नाहीतर द हंड्रेडमध्येही ती खेळली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषकात स्मृती मानधना भारतीय संघाची मुख्य खेळाडू आहे.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आणि आईचे नाव स्मिता आहे. वडील श्रीनिवास मानधना हे माजी जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. स्मृती दोन वर्षाची असताना कुटुंब सांगली येथे स्थलांतरीत झाले. सांगलीत स्मृतीने प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले.

स्मृतीचा क्रिकेटप्रवास मोठा रंजक आहे. तिचा भाऊ श्रवण क्रिकेट सरावासाठी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर जात असे. वडील श्रीनिवास त्याला घेऊन जायचे. छोटी स्मृती सोबत असायची. श्रवणचा सराव सुरू असताना वडील स्मृतीला चेंडू टाकत बसायचे. ती ते तडकवायची. हळूहळू तिला क्रिकेटची गोडी लागली. विष्णू शिंदे, अनिल जोब, अनंत तांबवेकर, प्रकाश फाळके असे सांगलीतील प्रशिक्षक 'स्मृतीला चांगले भवितव्य आहे.' असे सांगायचे. तिने मेहनतीने ते सिद्ध करून दाखवले. भारतीय संघाचे दार तिच्यासाठी उघडले गेले, तेव्हा तिचे कुटुंब भाड्याने छोटा बंगला घेऊन राहत होते. 

 स्मृती नऊ वर्षांची असताना तिची महाराष्ट्र अंडर 15 या संघात निवड झाली. यानंतर स्मृती अकरा वर्षाची असताना महाराष्ट्र अंडर 19 संघात निवडली गेली. 2013 मध्ये स्मृती मानधनाने एकदिवसीय सामन्यात डबल शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 2014 मध्ये सुरूवात झाली. इंग्लंडविरुद्ध वॉर्मस्के पाक येथे कसोटीत पदार्पण झाले. वेस्ट इंडीज येथे 2018 मध्ये झालेल्या महिला विश्‍वचषक टी-20 साठी तिची भारतीय संघात निवड झाली. गुवाहाटी येथे टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध महिला संघाचे नेतृत्व केले होते तेंव्हा ती भारतातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार बनली. स्मृतीला आणखी खुप क्रिकेट खेळायचे आहे.

No comments:

Post a Comment