Wednesday 29 July 2020

10 अंक आणि राग यांची गंमत

'राग आला की दहा अंक मोज' असं आपल्याला कुणी तरी सांगितलेलं असतं. काहीजण हा उपाय करून पाहतात,परंतु राग काही गेलेला नसतो. मग दहा अंक मोजायला का सांगितलं जातं? यामागचं नेमकं रहस्य काय आहे? तर दहा अंक मोजायचे म्हणजे दहा श्वास मोजायचे. हे जर समजून सांगितलं तर तुम्हाला 10 अंकांचे रहस्य उलगडून मिळेल. अंक मोजणे हा रागावरचा फर्स्ट एड आहे. म्हणजेच तातडीने करावयाचा उपाय! 10 अंक मोजणे म्हणजे 10 श्वास मोजणे. तसं बघायला गेलं तर दहा अंक मोजायला गेलं तर दहा काय अगदी चार-पाच सेकंदही लागत नाहीत. तेवढ्यात राग जात नाही. यासाठी मोजून 10 श्वास घ्यावे लागतील. राग आला की आपला श्वास बदलतो.आपण जोरजोरात नाकपुड्या फुगवून श्वास घेऊ लागतो. त्याऐवजी क्षणभर थांबून हवेचा आवाज होऊ न देता दीर्घ श्वास घ्यायचा आणि क्षणभराने उच्छवास सोडायचा. तोही हळूहळू. आणि सोडतानाही झटकन न सोडता हलकेच श्वास सोडायचा. एका अंकात श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया संथपणे झाली पाहिजे. श्वास सोडताना जरा अधिक वेळ घ्या. अशा रीतीने 10 श्वास घ्या. 10 दीर्घ श्वास आणि प्रदीर्घ उच्छवासामुळे श्वासनाचं नियंत्रण होतं. मेंदूला अधिक प्राणवायू मिळतो आणि रागामुळे शरीरात झालेला जीवरासायनिक बदल नॉर्मल येतो. आपण रागावलेलो असतो तेव्हा शरीरात जीवरासायनिक बदल होतात. शरीर अकारण उत्तेजित होते. या रासायनिक बदलामुळे भावनिक मेंदू चेतवला जातो आणि विचारशक्तीचं केंद्र असलेल्या कपाळामागील 'फ्रॉटल' मेंदूवर त्याचा ताबा होतो. विचार, तर्क, कार्यकारणभाव, योग्य-अयोग्य ठरवणाऱ्या मेंदूवर संतापाच्या रसायनांचा अंमल चढतो. साहजिकच विचार कुंठित होतो. आपण काहीतरी बडबडायला लागतो. आक्रमक होतो, या क्रिया अक्षरशः क्षणार्धात घडतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी संतापाच्या जीवरसायनामध्ये सत्व म्हणजे निमिषार्धात बदल व्हावा लागतो. केवळ श्वासांच्या नियंत्रणानं ते शक्य होतं. प्रत्येक श्वासाबरोबर मिळणाऱ्या प्राणवायूमुळे मेंदूत बदल घडतो. त्यासाठी मेंदूला प्राणवायूचा अधिक पुरवठा लागतो. मग आपलं मन रागाच्या कारणाचा विचार करणं सोडून देतं आणि शांत होतं. इतका साधा वैज्ञानिक विचार यामागे आहे. आपणही करून बघा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment