Wednesday 8 July 2020

आईस्क्रीमचा शोध

मित्रांनो,आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यात तर 'ठंडा ठंडा कूल कूल' आईस्क्रीम खाताना खूपच भारी वाटतं. पण या आईस्क्रीमचा शोध कुणी लावला, कसा लावला माहिताय का? सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये आईस्क्रीम तयार करण्यात आल्याचं म्हटलं जातं. 'बीबीसी'च्या एका अहवालात इ.स.200 च्या सुमारास दूध आणि भात यांपासूनचे गोठलेले मिश्रण चीनमध्ये तयार झाल्याची नोंद इतिहासात आहे. आताचे आईस्क्रीम होण्याअगोदरचा हा थंड पदार्थ आहे बरं का! असं म्हटलं जातं की, 13 व्या शतकात बर्फसुद्धा एक मौल्यवान गोष्ट होती. कारण आईस्क्रीम तयार करण्यात बर्फ मिळणं महत्त्वाचं होतं. पूर्वी युरोपात  बर्फ विहिरीत किंवा लाकडी पेटीत साठवला जात होता. मीठ आणि बर्फ यांच्या मिश्रणातून द्रव पदार्थ गोठवला जात असे. याचपद्धतीने आईस्क्रीम तयार केला जात असे. 20 व्या शतकापर्यंत म्हणजेच फ्रीजचा शोध लागेपर्यंत अशा प्रकारेच द्रव पदार्थ गोठवले जात. भारतातही अगदी अलिकडेपर्यंत पार्टी, समारंभाला आईस्क्रीमचे पॉट भाड्याने आणून आईस्क्रीम तयार केले जात असे.

आजच्या पद्धतीने आईस्क्रीम सर्वात पहिल्यांदा तयार करण्यात आलं इटलीमध्ये! 16व्या शतकात इटलीची डचेस कॅथरीन हिने प्लेवर्ड आईस (वेगवेगळ्या स्वादातील बर्फ) या विषयातील जाणकार असलेले शेफ इटलीहून फ्रान्सला नेले. इंग्लंडमध्ये1672 मध्ये एका समारंभात राजा चार्ल्स याला आईस्क्रीमची मेजवानी देण्यात आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.त्याकाळी आईस्क्रीमची रेसिपी फक्त राजघरण्यापुरती मर्यादीत होती. पण पुढे रेसिपी सांगणारी पुस्तके प्रकाशित झाली आणि ती सर्वदूर पोहचली. अमेरिकेत आईस्क्रीम सोडा प्रसिद्ध होता.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी आईस्क्रीम कोन आणि फळांचे आईस्क्रीम लोकांच्या पसंदीस उतरले. विसाव्या शतकाच्या अखेरीस फ्रीजचे उत्पादन वाढले तसे आईस्क्रीमचेही वाढीस लागले. बगदादमध्ये पूर्वीच्या काळी आईस्क्रीम हा पदार्थ खलीफांचा आवडीचा होता. आईस्क्रीममध्ये दुधाचा वापर करण्याची सुरुवात अरबांनी केली. फळांच्या रसाऐवजी साखर घालून तो गोड पदार्थ बनवण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. दहाव्या शतकापर्यंत बगदाद, दमास्कम आणि कैरोसारख्या अरब देशांमध्ये आईस्क्रीम लोकप्रिय बनले होते. ग्रीकमधील पुरातन पाककृतींमधील काही प्रकार या आईस्क्रीमशी मिळतेजुळते आहेत. त्यात गुलाबपाणी, सुकामेवा भरपूर प्रमाणात वापरला जात असे. 1744 मध्ये 'ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी'मध्ये आईस्क्रीमचा उल्लेख आढळतो.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत आईस्क्रीमची चैन पोहचली होती. यामध्ये इटली आघाडीवर होता. तिथूनच पुढे हे लोण इंग्लंड आणि मग अमेरिकेत पोहचले. दरम्यान , आईस्क्रीमचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले होते. सुरुवातीला आईस्क्रीम ग्लासमध्ये दिले जाई. मग कोन आणि कप यांचा वापर वाढला. 1923 मध्ये लंडन येथे वॉल्स कंपनीने पहिल्यांदा सायकलवरून आईस्क्रीम विकायला सुरुवात केली. नंतर दुकानांमध्ये फ्रीझर ठेवून आईस्क्रीम विकले जाऊ लागले.
आईस्क्रीम हा एक दूध किंवा क्रीमपासून बनवलेला फ्रोजन डेझर्टचा प्रकार आहे. त्यात वेगवेगळा स्वाद येण्यासाठी घटकद्रव्ये तसेच फळं किंवा फळांचा रस घातला जातो. आईस्क्रीममध्ये साखर किंवा स्वीटनर टाकला जातो. प्रत्येक देशात आईस्क्रीम वेगवेगळे असते. काही देशांमध्ये'फ्रोजन कस्टर्ड' ला आईस्क्रीम म्हटले जाते. गोठलेल्या सरबतलाही आईस्क्रीम म्हटले जाते. दुधाऐवजी काही देशात सोया मिल्कचा वापर करतात.  आपल्याकडील कुल्फी हा आईस्क्रीमचाच प्रकार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment