Wednesday 29 July 2020

निसर्गसौंदर्य, खनिजसंपत्ती संपन्न: झारखंड

झारखंड-भारतातील 2000 मध्ये अस्तित्वात आलेलं एक राज्य. हे राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी बिहारचा एक भाग होते. राज्याच्या राजधानीचं शहर रांची. राजधानीचं स्वरूप आणि दर्जा मिळाल्यापासून या शहरात अनेक सुधारणा झाल्या आहेत. उंच उंच इमारतीदेखील इथे उभारल्या आहेत. रांची,धनबाद, बोकारो, जमशेदपूरसारख्या औद्योगिक प्रगतीनं वेढलेल्या शहरांनी झारखंडला एक वेगळं स्थान दिलंय. औद्योगिक प्रगतीमुळे व उद्योगधंद्यांमुळे शेजारच्या आसाम,पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, पंजाबसारख्या राज्यांतून असंख्य लोक इथं येऊन स्थायिक झाले. या प्रदेशातील मूळ निवासी अर्थात आदिवासी व आदिम जाती-जमातींनी जरी राज्याच्या प्रगतीत आपापला वाटा उचलला असला तरी ते स्वतःला पूर्णपणे या नवीन प्रवाहात मात्र झोकून देऊ शकले नाहीत. शहरीकरणापासून त्यांनी स्वतःला तसं दूरच ठेवलं. उलट मुंडा, संथाळ, असुर, उरांव, हो, खरवार, खडीया, परहिया, बिरहोरसारख्या आदिवासी जाती-जमाती दूर जंगलात आणखी खोलवर जाऊन वसल्या. काही जाती-जमाती तर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. काही आदिवासी जाती-जमातीच्या लोकांनी सरकारने दिलेल्या मदतीच्या व सवलतीच्या जोरावर आपली प्रगती व उन्नती साधली आहे. 
झारखंड ही विपुल निसर्गसौंदर्य आणि खनिज संपत्तीची भूमी आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक झारखंड वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ब्रिटिशांना भारतातून जाऊन आज 70 वर्षे उलटून गेली तरी झारखंडमध्ये आजही एक असं गाव आहे, त्या गावात फक्त अँग्लो इंडियन लोकांचीच वस्ती आहे. या गावाचं नाव आहे- मॅकलुसिगंज. रांचीपासून 55 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश येथून निघून गेले तरी काहींना इथल्या वास्तव्याचा मोह सुटला नाही. इथले भव्य बंगले व बागा पूर्वीच्या त्यांच्या विलासी जगण्याची साक्ष देत उभ्या आहेत. 
चांडील धरण ही झारखंडची सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे. धरण बांधताना पाणीपुरवठा, वीजनिर्मिती, मत्स्यपालन, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. 'उलगुलान' जागविणाऱ्या बिरसा मुंडाची झारखंड ही भूमी. या भूमीचं ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. ही भूमी कोळशानं समृद्ध आहे. असं म्हटलं जातं की, इथल्या जमिनीत 500 फूट खाली कोळसा जळत असतो. अनेक शतकांपूर्वी झालेल्या भूकंपांनी झारखंडला खजिनांनी मालामाल केलंय. कोळशानं झारखंडचं नशीबच पालटून टाकलंय. पण हा कोळसा 500 फूट जमिनीखाली जळताना झारखंडला आपल्या तप्त झळांनी तापवत असतो. इथल्या नक्षलवाद्यांचंही तसंच आहे. सामान्यजनांसाठी पाठराखण करण्याचं व्रत त्यांनी घेतलंय. पण या व्रताला हिंसा आणि दहशतवादाची किनार आहे. या आतंकाखाली झारखंड सतत बेचैन असतं. पलाश वृक्षांची लालभडक फुले आणि त्यांच्या नाजूक पाकळ्या, जोडीला मोहाची मादकता आणि मस्ती अनुभवत झारखंड खऱ्या अर्थानं जळत्या कोळशावर वसलंय.-मच्छिंद्र ऐनापुरे,सांगली 7038121012

No comments:

Post a Comment