Saturday 4 July 2020

पी.सावळाराम


कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाऊस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला. पी.सावळाराम यांचे खरे नाव नवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही। या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.
मा.पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले नवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, नवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर नवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधम्यार्तुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, उष:काल ह्या कादंबरीमधील सावळ्या ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र नवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या सावळ्याचे साधम्र्य जाणवायचे. ते नवृत्ती पाटील ह्यांना सावळ्या नावाने हाकारायचे झाले. अशा रीतीने नवृत्ती पाटील ह्यांनी आपले पी.सावळाराम हे नाव धारण केले. पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने पी. सावळाराम गौरवग्रंथ प्रकाशित केला.

No comments:

Post a Comment