Thursday 16 July 2020

नील आर्मस्ट्राँग

२0 जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्राँग यांच्या नावाची इतिहासात नोंद आहे. पण, अंतराळवीर बनण्याआधी आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९00 पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता.
त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते. नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २0 ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता. आर्मस्ट्राँग यांना २६ जानेवारी १९४९ रोजी नौदलाकडून नियुक्ती पत्र मिळाले आणि त्यांनी पेंसाकोला नेवी एअर स्टेशनमध्ये १८ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या २0 व्या वर्षीय त्यांना नौदल पायलटचा दर्जा मिळाला. त्यानंतर त्यांना सॅन डिएगो येथील फ्लीट एअरक्राफ्ट सर्विस स्क्वाड्रन-७ मध्ये नियुक्त केले गेले. ३ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांना पहिल्यांदा सशस्त्र उड्डाण करावे लागले. कोरिया युद्धातील ७८ मिशनदरम्यान १२१ तासांचे उड्डाण केले आणि या युद्धकाळात त्यांना पहिल्या २0 मिशनसाठी एअर मेडल, पुढच्या २0 मिशनसाठी गोल्ड स्टार आणि कोरियन सर्व्हिस मेडल देऊन गौरविले. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी नौदलाचा राजीनामा दिला आणि संयुक्त राज्य नौदल रिझर्व्हमध्ये २३ ऑगस्ट १९५२ रोजी ते लेफ्टनंट (ज्युनिअर ग्रेड) पदावर रुजू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर १९६0 मध्ये सेवानवृत्त झाले.यादरम्यान आर्मस्ट्राँग यांची अमेरिकन वायुदलातर्फे मॅन इन स्पेस सूनसेट कार्यक्रमासाठी निवड झाली. त्यांना १९६0 च्या नोव्हेंबरमध्ये एक्स-२0 डायनासोरचे टेस्ट पायलट म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर १९६२ मध्ये अंतराळ प्रवासाला जाण्याची संभावना असलेल्या सात पायलटमध्ये आर्मस्ट्राँग यांचा समावेश करण्यात आला. त्या वेळी अंतराळ यानाचे डिझाईन तयार होत होते. २0 सप्टेंबर १९६५ रोजी जेमिनी-८ अंतराळ यानाच्या चालक दलाची घोषणा करण्यात आली आणि नील आर्मस्ट्राँग यांना या चालक दलाचे कमांड पायलट तर डेव्हिड स्कॉट यांना पायलट बनविले गेले.

No comments:

Post a Comment