Thursday 23 January 2020

जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र: वाराणशी

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र, भारतातील बारा ज्योतिर्लिगांपैकी एक व त्याच नावाच्या जिल्ह्याचे आणि विभागाचे मुख्यालय. प्राचीन बौद्ध, जैन व हिंदू साहित्यात त्याची काशी वाराणसी, बनारस, अविमुक्त, आनंदवन, महाश्मशान, व्याप्ती अशी नामांतरे आढळतात. शिवाय काशेयपूर, अमरावती, केतुमती, पुष्पवती, रंगनगर, तीर्थराजी इत्यादी नावांचाही उल्लेख आढळतो. बनारस हे नाव अनेक वर्षे वापरात होते, परंतु २४ मे १९५६पासून शासनाने वाराणसी या नावाचा अधिकृतपणे वापर सुरू केला.
गंगा नदीच्या अर्धचंद्राकृती पात्राच्या उत्तरेस डाव्या काठावर ते अलाहाबादच्या पूर्वेस सुमारे १३0 किमीवर वसले आहे. ईशान्य व नैऋत्य सरहद्दींवरील वारणा (वारणावती किंवा वरुणा) व अशी या दोन नद्यांनी वेढल्यामुळे वाराणसी या नावाने प्रख्यात झालेल्या या नगरी सभोवतालचा प्रदेश काशी या नावाने प्रसिद्ध होता. पुराणकाळात तिचे काशी हेच नाव रूढ झाले. काशी या नावाची व्युत्पुत्ती काश्य प्रकाशणे या धातूवरून किंवा काश्यजन यावरून आली असावी. मध्ययुगातील ताम्रपटांतून ही दोन्ही नावे प्रचारात असल्याचे दिसते. मुसलमानी अमलात (बारावे व सतरावे शतक) वाराणसीचे बनारस हे फासी अपभ्रष्ट रूप प्रचारात आले. काही तज्ञांच्या मते हे वारणेचे प्राकृत रूप असावे.
रामायण, महाभारत, स्कंद, लिंग, मत्स्य, पद्म, अग्नी इत्यादी पुराणे, बौद्ध जातके, बृहत्संहिता, मआसिर-आलम-इ-गीरी इत्यादी ग्रंथांत, फाहियान, ह्यूएनत्संग, इत्सिंग इत्यादी चिनी प्रवाशांचे तसेच पाश्‍चात्त्य प्रवाशांचे वृत्तांत इत्यादींतून वारासणीविषयी माहिती मिळते. बौद्धपूर्वकाळात गंगा-यमुना दुआबातील पाच जनपदांपैकी काशी (वाराणसी) एक असून बौद्ध अंगुत्तर निकायमते तत्कालीन भारतातील सोळा महाजनपदांमध्ये व सात प्रमुख देशांमध्ये तिची गणना होत होती. उज्‍जवल प्राचीन इतिहासाबरोबरच वाराणसीविषयी अनेक पौराणिक कथा व आख्यायिका आहेत. येथील राजांची कोसल, मगध व अंग देशांचे राजे यांच्याबरोबर वारंवार युद्धे होत. अखेर कोसलच्या कंस राजाने वाराणसी जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केली. महाभारतानुसार काशीराज दिवोदास हा या नगरीचा संस्थापक असून त्याने इंद्राच्या आ™ोवरून गंगेकाठी हे नगर वसविले. हरिवंशात ही कथा थोडी वेगळी आहे. तीत काशकुलोत्पन्न धन्वंतरी दिवोदास पणतूने भद्श्रेण्य राजास ठार मारून तेथे नवीन वसाहत स्थापिली. काही अभ्यासकांच्या मते वाराणसीच्या आर्य वसाहतीकरणाचा आणि शिवोपासना स्वीकृतीचा रूपकात्मक निर्देश आख्यायिकांत मिळतो. आधुनिक अभ्यासक वाराणसीची स्थापना शिवपूजक अनार्यानी केली असे मानतात.
महाभारतकाळात हा प्रदेश जरासंधाच्या अमलाखाली होता. भारतीय युद्धानंतर कुरू राजाने तो वत्स राज्यात समाविष्ट केला. बौद्धकालात हा प्रदेश मगध, कोसल, वत्स आणि उज्जयिनी या प्रमुख राज्यांपैकी एकामध्ये आलटून-पालटून समाविष्ट असे. पुढे शिशुनाग, मौर्य, शुंग आणि कण्व वंशांच्या सत्ताकाळात हा प्रदेश त्यांच्या-त्यांच्या साम्राज्यात होता. गौतम बुद्धाच्या धर्मचक्र प्रवर्तनामुळे या नगरीच्या उत्तरेकडील सारनाथाला माहात्म लाभले. शुंगांच्या कारकिर्दीत संस्कृत भाषा आणि यज्ञादी कर्मकांडांना महत्त्व प्राप्त होऊन वाराणसी हे त्यांचे प्रमुख केंद्र बनले. पुढे क्षत्रपांनी येथे राज्य केले. त्यानंतर कुशाण घराण्यातील कनिष्क या प्रदेशाचा अधिपती झाला. त्याने बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला.
भारशिव नाग राजांनंतर वाराणसीचा गुप्त साम्राज्यात (इ. स. ३२१-५५५) समावेश झाला. स्कंदगुप्ताने हुणांचा पराजय करून या नगरीचे पावित्र्य अबाधित ठेवले. वाराणसीजवळील एका शिलालेखात त्याचा उल्लेख आढळतो. गुप्तांनंतर कनौजच्या हर्षवर्धनाने (कार. ६0६-४६) वाराणसीवर आधिपत्य मिळविले. हर्षोत्तरकाळात शंकराचार्य आणि कुमारिल भट्ट यांनी येथे धर्मविजय केले. शंकराचार्य आणि मंडनमिर्श यांमधील प्रसिद्ध वादही याच ठिकाणी झाला. अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी येथे उपराजधानी स्थापन केली. या वंशातील जयचंद राजाचा मुहम्मद घोरीने पराजय करून येथील मंदिरांची प्रचंड लूट केली. मुहम्मदाच्या जागी दिल्लीच्या तख्तावर आलेला कुत्बुद्दीन ऐबक (कार. १२0६-१0) आणि त्यानंतरचा अलाउद्दीन खल्जी यांनी येथील सुमारे १,000 मंदिरे नष्ट केली. पुढे जौनपूरच्या शर्की वंशाने १३९४ ते १४७७पयर्ंत यावर राज्य केले. पुढे मोगल बादशाह बाबराने हे जिंकून घेतले. तेव्हापासून शाहआलमच्या कारकिर्दीपयर्ंत ते मोगल बादशाहांच्या आधिपत्याखाली राहिले.
हुमायूनच्या (कार. १५३0-४0 व १५५५-५६) वेळी कबिराने हिंदू आणि इस्लाम धर्माच्या समन्वयवादाचे प्रतिपादन येथेच केले. अकबर बादशाहाच्या काळात (कार. १५५८-१६0५) गोस्वामी तुलसीदासाने रामचरितमानस हा सुविख्यात ग्रंथ येथेच लिहिला.
उद्ध्वस्त विश्‍वेश्‍वर मंदिर अकबराच्या कारकिर्दीत १५८५मध्ये नव्याने बांधण्यात आले, औरंगजेबाने (कार. १६५८-१७0७) ते जमीनदोस्त करून (१६६९) त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूवर जझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तेथील शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापीमध्ये हलविले. त्याकाळी मंदिराच्या जागेला विश्‍वेश्‍वर प्रतिमा मानून भक्तजन त्यास नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करीत असत. स्वातंत्र्योत्तर काळात १९४९मध्ये वाराणसी उत्तर प्रदेश राज्यात विलीन करण्यात आले. तत्कालीन राजे विभूतिनारायणसिंह यांनी काशीराज न्यास स्थापून त्याचा निधी पुराणांच्या संशोधित आवृत्त्या प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध करून दिला.

   

No comments:

Post a Comment