Monday 27 January 2020

सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्या त्या प्रसिद्धीपासून कायम अलिप्त राहिल्या. सुमन कल्याणपूर या मूळच्या बंगालच्या. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे २८ जानेवारी १९३७ मध्ये त्यांचा जन्म झाला. सुमन हेमाडे हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्वत्र परिचित झाल्या. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. शास्त्रीय संगीताचा त्यांनी कसून अभ्यास केला.
बंगाली, ओदिशा, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपूरी या भाषातील गाणीही त्यांनी म्हटली. गझल, ठुमरी, भक्तीगीते यात त्यांना जास्त गोडी होती. तुम्हाला 'ब्रह्मचारी' चित्रपटातले 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर' हे गाणे आठवतं? ते लता मंगेशकर यांनी गायले आहे, असे तुम्हालाही वाटते ना? हे गाणे सुमन कल्याणपूर नावाच्या गायिकेने गायले आहे, हेच अनेकांना माहित नाही. सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळेच झाला. एका गाण्याच्या कार्यक्रमात तलत यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज ऐकला आणि ते भारावूनच गेले. तलत यांनी त्यांची एचएमव्ही म्युझिक कंपनीकडे शिफारस केली. योगायोग म्हणजे तलत यांच्याबरोबर चित्रपटातले पहिले गाणे कल्याणपूर यांचेच. अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा पार्श्‍वगायन केले. तो चित्रपट होता १९५४ मध्ये आलेला 'मंगू'. गाण्याचे शब्द होते, 'कोई पुकारे धीरे से तुझे'. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक गीतामध्ये जीव ओतून त्यांनी चाहत्यांचे कान तृप्त केले. लता मंगेशकर, आशा भोसले, नूरजहाँ अशा गायिकांच्या पंक्तीत त्यांनी स्थान मिळवले.

No comments:

Post a Comment