Saturday 18 January 2020

हिंदुस्थानी संगीत गायक:मास्टर कृष्णराव

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव (जानेवारी २0, १८९८ - ऑक्टोबर २0, १९७४) हे हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते. मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायक नटाचे काम सुरू केले.
कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यामुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वाचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौर्‍याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्यप्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूश होते. इ. स. १९१0 मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. स्वत: सवाई गंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते.
सांगीतिक कारकीर्द
आपल्या गुरुंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बर्‍याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.
गुरुंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यासारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.
मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा, 'वहाँ', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या वसंतसेना चित्रपटाचा समावेश आहे. तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.
संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ. स. १९२२ ते इ. स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचिकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी र्शोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मीळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते र्शोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ. स. १९४0 ते इ. स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे.
'वंदे मातरम' हे गीत बॅण्डवर वाजवता येत नाही. वंदे मातरम अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅण्डवर वाजवता येतात, हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरुंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. 'वंदे मातरम'ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.

No comments:

Post a Comment