Thursday 23 January 2020

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त: आकाश खिल्लारे

बालपणीचे वय हे खेळण्या बागळण्याचे वय असते. या वयात आपण कोणाची कुठल्याही प्रकारची मदत करण्याचा साधा विचारही बहुतेकांच्या मनात येत नाही. मात्र, बालपणापासूनच स्वत:चा विचार न करता आपल्या अवतीभवती वावरणार्‍या समाजाचा विचार करणारेही याच जगात वावरत तेही कोवळ्या मनाचे याचा बर्‍याचदा अनुभव येतो. मग, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून इतरांच्या मदतीला धावणार्‍यांचा तितक्याच उंचीचा पुरस्कार देऊन सन्मान व्हावा या हेतूने २ ऑक्टोबर १९५७ पासून राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची प्रथा रूढ झाली आहे.
यंदाच्या देशभरातील बाल पुरस्कार मिळणार्‍यांमध्ये महाराष्ट्रीयन औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाली गावातील १५ वर्षीय आकाश खिल्लारे याला २0१९ चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर १९५७ दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली. तेव्हा हरिश्‍चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वत:कडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली. त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली. पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्‍चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला, हे विशेष. महाराष्ट्रातील दोन वीर बालकांना यंदा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी परेल परिसरात राहणारी १0 वर्षी झेन सावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाली गावातील १५ वर्षी आकाश खिल्लारे यांना २0१९ चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारेने एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेत जात असताना त्याला बुडणार्‍या मायलेकी दिसल्या. त्याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या दोघींना वाचवले होते. १९५७ पासून २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला देशातील वीर बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. चार श्रेणींमध्ये देण्यात येणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.

No comments:

Post a Comment