Saturday 25 January 2020

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के.लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. लेखक आर. के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. हार्पर्स, पंच, ऑन पेपर, बॉइज, अँटलांटिक, अमेरिकन मक्र्युरी, द मेरी मॅगझिन, स्ट्रॅण्ड मॅगझिन अशी मासिके त्यांना तिथे पाहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले.
अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झमध्ये आणि नंतर फ्री प्रेस र्जनलमध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी ह्यफ्री प्रेसची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५0 वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही. लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे - चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्‍वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत. त्यांच्यावर तोच तोचपणाचे आरोपही झाले, पण त्यांनी कधी चिडून कोणाला उत्तर दिले नाही. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूणार्कृती पुतळाही बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. आर.के, लक्ष्मण हे कथालेखक व कादंबरीलेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही पुस्तके आहेत. लक्ष्मण यांचे थोरले भाऊ प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्यासाठीही बरीच व्यंगचित्रे काढली. तसेच इतर अनेक लेखकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या कथा दैनिक 'हिंदू'मधून प्रसिद्ध होत असत. या कथांसाठी लक्ष्मण यांच्याकडूनच ते चित्रे काढून घेत असत. सरावाने आर.के. लक्ष्मण अधिकाधिक चांगली चित्रे काढू लागल्यामुळे इतर लेखकही त्यांच्याकडून चित्रे काढवून घेऊ लागले. त्यांच्या पत्नी कमला यांच्या गोष्टींसाठीही त्यांनी चित्रे काढून दिली. व्यंगचित्रांचे त्यांना विशेष आकर्षण होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. स्थानिक वर्तमानपत्रांतूनही त्यांच्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळत असे.

No comments:

Post a Comment