Friday 31 January 2020

राजा बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. सुरुवातीला राजा बढे यांनी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात नोकरी केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्‍वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते आणि पुढे सावधान साप्ताहिकात लागले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करीत होते.
या नोकर्‍यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले. राजा बढे यांनी १९४0 च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. सिरको फिल्म्समध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते प्रकाश स्टुडिओत रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी स्वानंद चित्र ही संस्था उभी केली आणि 'रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेतेला भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच 'चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. 'कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वातट्रिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविध वृत्तात त्या प्रकाशित होत असत.

No comments:

Post a Comment