Friday 24 January 2020

रमाबाई रानडे

रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वार्शमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला.
रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वज्र्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केले. न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे.

No comments:

Post a Comment