Thursday 30 January 2020

गायिका-अभिनेत्री सुरैय्या

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रीय संगिताचे धडे घेतले नव्हते तरीही तिच्या कारकीर्दीत तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओमध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओमध्ये 'ताजमहल'चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी 'पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला...' हे गाणं गाऊन घेतलं .. सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठय़ा असलेल्या मेहताबला मात्र तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपयर्ंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं. १९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. त्यातले विशेष उल्लेखनीय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहिली संधी तिला मिळाली ती 'तदबीर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतु के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख 'गायिका-अभिनेत्री' अशी नव्याने करून दिली.

1 comment: