Monday 17 August 2020

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस (२३ जानेवारी १८९७ ते १८ ऑगस्ट १९४५) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. 'नेताजी' ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओडिशा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. सुभाषबाबूंवर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता. कॉलेजमधील पहिले वर्ष संपल्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुटीत सतराव्या वर्षी ते आणि त्यांच्यासारखे त्यांचे चार-पाच मित्र गुरूच्या शोधार्थ निघाले. गुरू तर मिळाला नाहीच उलट तीर्थक्षेत्री जातिपातीचे प्रस्थ, शिवाशीव पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. अशुतोष मुखर्जींच्या मदतीने त्यांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला (१९१७). ते तत्त्वज्ञान विषय घेऊन पहिल्या वर्गात बी. ए. झाले (१९१९). त्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार ते 'आयसीएस'साठी इंग्लंडला गेले. त्यावेळी असहकार आंदोलन सुरू झाले नव्हते. जालियनवाला बाग येथे काय घडले, त्याची पूर्ण कल्पना पंजाब बाहेरच्या लोकांना आली नव्हती. परीक्षेत यश मिळाल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उजेडात आल्या. आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी पहिली सक्तीची एक वर्षाची उमेदवारी न करता सरळ नोकरीचा राजीनामा देऊन स्वदेशाची वाट धरली (१९२१). यावेळी महात्मा गांधींच्या असहकार चळवळ जोरात होती. त्यांची भेट घेऊन पुढील दिशा समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा गांधीनीच त्यांना कोलकात्याला चित्तरंजन दासांकडे (१९२१) पाठविले. मृत्यूपर्यंत चार वर्षे सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजनच होते. या सुमारास इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कोलकात्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली. त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला (१९२१). त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. तुरुंगात दासांच्या पुरोगामी विचारांचा सुभाषबाबूंवर फार मोठा परिणाम झाला. कारावासानंतर ते काही दिवस बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते.

No comments:

Post a Comment