Friday 28 August 2020

चरित्रग्रंथ वाचन व्हावे


मुलांनी ,आजच्या युवक-युवतींनी थोर व्यक्तींची चरित्रे वाचली पाहिजेत. ज्यांनी शून्यातून आपल्या जीवनाला यशस्वी आकार दिला, यांच्या अनुभवाचे बोल वाचले पाहिजेत. जगातल्या अनेकविध क्षेत्रात अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आवडणाऱ्या अशा 'हिरो'चे आयुष्य वाचून काढले पाहिजे. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळत जाते. प्रसिद्ध लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी म्हणतात की, कर्तृत्वाशिवाय व्यक्तीला मोठेपण प्राप्त होत नाही. पण हे मोठेपण सहज प्राप्त होत नाही.या जगात जी माणसं स्वकर्तृत्वावर मोठी झाली,त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.नियती त्यांची सत्त्वपरीक्षा घेत होती.तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली. जीवनाबद्दलची निष्ठा,प्रचंड ध्येयवाद, दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली,म्हणून त्यांचा जीवनग्रंथ समृद्ध आणि संपन्न झाला. इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरला. अशा कर्तृत्ववान लोकांचे जीवनग्रंथ मुला-मुलींनी वाचायलाच हवीत. यामुळे त्यांच्या मनात आकांक्षा निर्माण होण्यास मदत होईल आणि मुला-मुलींना स्वतः चे एक कर्तृत्वशिखर खुणावू लागेल. मुलं मोठ्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने त्या शिखरांच्या दिशेने झेपावतील. 'असाध्य ते साध्य।करिता सायास।।'या संत तुकारामांच्या तत्त्वज्ञानाची अनुभूती घेतील.आणि मग त्यांचाही जीवनग्रंथ देखणा होईल. विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचे साहित्य मुलांच्या वाचनात आले तर त्यांच्या विचारांच्या, माहितीच्या, कल्पनेच्या कक्षा रुंदावतील.यात मुलांना आपला 'हिरो' सापडून जाईल. त्यामुळे गिर्यारोहक, मानववंशशास्त्रज्ञ, उद्योगपती, बॉर्डर रोडस् किंवा धरणे बांधणारे इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, यशस्वी राजकीय नेते,प्रगतशील शेतकरी,वक्ते, संशोधक  यांनीही मुलांसाठी आपलं चरित्र उलघडून दाखवावं. अशा साहित्यामुळे मुले धाडसी, सर्जनशील बनतील. त्याला आपला मार्ग यातून सापडून जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment