Sunday 16 August 2020

वाराणसी: धार्मिक, अध्यात्मिक शहर

वाराणसी हिंदूंचं एक पवित्र,धार्मिक शहर आहे. गंगानदीकाठची ही अत्यंत प्राचीन वसाहत आहे. तसेच 'वरुणा' व 'अस्सी' नदीच्या मधला भूभाग म्हणजेच वाराणसी. या शहराला 'काशी'सुद्धा म्हटलं जातं. 'काशी' हा शब्द संस्कृत 'कास' शब्दावरून आला असावा, ज्याचा अर्थ आहे प्रकाश. धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणामुळे आयुष्य प्रकाशमान होतं. म्हणूनच धर्म व अध्यात्माचं शैक्षणिक केंद्र असलेल्या या शहराला 'काशी' हे नाव सार्थ वाटतं. भगवान शिवानं हे स्थळ स्वतः शोधून काढलं, असं म्हटलं जातं. वाराणसीत जवळपास शंभराहून अधिक घाट आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात या घाटांचं जादुई रूप फार मोहक असतं. यावेळी या प्राचीन शहराच्या विशिष्ट संस्कृतीचं दर्शन घडतं. गंगा महोत्सव व देव- दीपावलीच्या दिवसांत तर या घाटांचं रूप अद्वितीय असतं. पणत्या, विजेचे दिवे, झेंडूची फुले, गुलाबाच्या पाकळ्यांनी या घाटांना सजवलं जातं.मंत्रपठण आणि ऋचांच्या आवाजाने सारं वातावरण भारलेलं असतं.अस्सी, दशाश्वमेध, पंचगंगा यांसारखे घाट फुलांची सजावट, विजेची रोषणाई व दिव्यांनी सणासुदीचा साज लेवून सजलेले असतात. काशी  विश्वनाथाचे येथे मंदिर आहे. इ.स. 1669 ला औरंगजेबाने या मंदिराला उद्ध्वस्त करून तिथं ज्ञानवाणी मशीद बांधली ,परंतु मंदिराच्या पुजाऱ्याने मूळ शिवलिंग मंदिरातून नेऊन विहिरीत लपवून ठेवलं. आताचं काशी विश्वनाथाचं मंदिर राणी अहिल्याबाई यांनी 1776 ला बांधलं. 

काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळच शनिचर (शनी) व अन्नपूर्णेचं मंदिर आहे. रामाचं तुलसीमानस हे संपूर्ण संगमरवरातील मंदिर, संकटमोचन ,कालभैरव, नवीन विश्वनाथ मंदिर अशी अनेक मंदिरे इथे आहेत. भारतमातेचं देखणं मंदिर फक्त वाराणसीत आहे. काशीत अनेक बुद्ध मंदिरेही आहेत. बुद्धानं जिथं आपली पहिली दीक्षा दिली ते सारनाथ वाराणसीपासून  अवघ्या 10 कि. मी. अंतरावर आहे. सम्राट अशोकानं इथं अनेक स्तूप व इमारती बांधल्या. अशोक स्तंभ, मूळ गंधाकुटीविहार, धर्मजाचक स्तूप अशा अनेक वास्तू त्यांनी बांधल्या. तिबेट, चिनी, थाई, बर्मी किंवा जपानी शैलीत बांधलेली अनेक आधुनिक मंदिरे आणि स्तूप इथे आहेत, जे प्रेक्षणीय आहेत.

या शहराला 'बनारस' हे नाव इंग्रजांनी दिलं होतं. इथे 2000 हजार एकर जमिनीवर बनारस हिंदू विश्वविद्यालय पसरलं आहे.बनारसच्या महाराजांनी ही जमीन दान केली आणि विश्वविद्यालयाचा पाया पंडित मदनमोहन मालवियांनी घातला. इथे संस्कृत व हिंदी भाषाव्यतिरिक्त आधुनिक शिक्षण पद्धतीची सुरुवात करण्यात आली. संस्कृत भाषा, भारतीय कला, संस्कृती व संगीत यांसाठी हे विश्वविद्यालय भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.  इथलं तोंडात विरघळणारं आणि आपली वेगळी चव जिभेवर व मनात रेंगाळत ठेवणारं बनारस पान आणि बनारस साडी प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे बनारस साडी विणण्याचं काम मुस्लिम कलाकार करतात. वाराणसीतील हिंदू-मुस्लिम संस्कृती अगदी दृष्ट लागण्यासारखी आहे. वाराणसी ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. तसेच साहित्यिकांचीही भूमी आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment