Sunday 23 August 2020

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म ५एप्रिल १९२७ रोजी सांगली जिल्हय़ातील माडगूळ (ता. आटपाडी) येथे झाला.हे मराठी ग्रामीण लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. त्यांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाड्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्‍चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५0 च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) यासारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, र्जमन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५0), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), या त्यांच्या कादंबर्‍या उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. 'पुढचं पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखविली आहे. त्यांनी नाटकेही लिहिली, तू वेडा कुंभार, सती, पति गेले गं काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. कुनाचा कुनाला मेळ न्हाई आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यात गावाकडील गोष्टी, काळी आई यासारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो. १९८३ साली अंबेजोगाई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 'सत्तांतर' या पुस्तकासाठी त्यांना १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जनस्थान पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले.२७ ऑगस्ट २००१ मध्ये त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment