Friday 7 August 2020

निसर्गाचा समतोल राखणारी वर्षारण्ये

वर्षारण्ये (Rain-forests) पृथ्वीवरील काही भागातच आढळतात. पृथ्वीवरील 6 टक्केच जागा अशा अवर्षारण्यांनी व्यापली आहेत. मात्र ती सगळ्या जगाचा पर्यावरणसमतोल साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही वर्षारण्ये कर्कवृत्त ते मकरवृत्त या पट्ट्यात म्हणजे उष्ण कटिबंधात मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण त्याला पोषक असं वातावरण या पट्ट्यात आहे. वर्षभर अधूनमधून पडणारा खूप पाऊस आणि दमट हवा याच भागात मिळते. ही वर्षारण्ये जगभर अनेक राष्ट्रांत विखुरली आहेत. गर्द आणि उंचच उंच घनदाट झाडी, की ज्यामुळे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहचू शकत नाही. अशा या अरण्यात कोट्यवधी झाडं, वनस्पती, अनेक प्रकारचे पक्षी ,प्राणी आणि इतर जीव आश्रयाला आहेत. या जंगलात जगातील जवळपास 50 टक्के वनस्पती आणि प्राण्यांना आसरा मिळतो.  जगातील सर्वात मोठं वर्षारण्य म्हणून ब्राझील आणि त्याच्या जवळपासच्या देशांत पसरलेलं अॅमेझॉन नदीच्या काठावरचं अती विस्तीर्ण अरण्य विख्यात आहे. अशी ही घनदाट अरण्यं फक्त दक्षिण अमेरिकेतच आहेत असं नाही, तर ती इतरही खंडात पसरली आहेत. अपवाद आहे तो

फक्त अंटार्क्टिका खंडाचा. या अरण्यांमुळे जागतिक तापमान मर्यादेत राहण्यास मदत होते आणि जगातल्या गोड्यापाण्याच्या स्रोतापैकी 20 टक्के पाणी या अरण्यांमुळे मिळतं. इथल्या वनस्पतींपासून अनेक औषधकंपन्या आजारावरची अनेक आयुर्वेदिक औषधं बनवत आहेत. यातली अनेक औषधं दुर्धर आजारांवर रामबाण औषध ठरत आहेत. अवघ्या चार चौरस मैलांच्या वर्षारण्यात साधारण 1500 प्रकारची फुलझाडं आणि 750 प्रकारचे वृक्ष आणि हजारो छोटे-मोठे जीव एका पाहणीत आढळून आले. इतकंच काय तर पेरू या देशातील वर्षारण्यात एका झाडावर मुंग्यांच्या 43 प्रकारच्या प्रजाती सापडल्या, इतक्या प्रजाती संपूर्ण ब्रिटनमध्येही बघायला मिळत नाहीत,

असं शास्त्रज्ञ सांगतात. यावरून वर्षारण्यातील जैवविविधतेची कल्पना येईल. कर्करोग, एचआयव्ही यांसारख्या आजारावर मात करणाऱ्या औषधी वनस्पती केवळ याच अरण्यात मिळतात. आणखी विशेष म्हणजे आजवर तिथल्या फक्त एक टक्का वनस्पतींचाच अभ्यास केला गेलाय.या शतकाच्या

सुरुवातीला जगात एकूण साठ लाख चौरस मैल एवढ्या विस्तृत क्षेत्रात ही अरण्यं पसरली होती, पण औद्योगिकीकरणामुळे आणि शहरांच्या वाढत्या विस्तारांमुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. बेसुमार प्रमाणात जंगलतोड हा त्याचाच एक भाग आहे. आज यातली निम्मी अरण्य माणसाच्या या

अतिक्रमणाचा बळी ठरली आहेत. ही जंगलतोड किती होते याचा नुसता अंदाजही बरंच काही सांगून जातो. दरवर्षी अंदाजे 88 हजार चौरस किलोमीटर जंगलं बेसुमार तोडीला बळी पडत आहेत. आणखी सोप्या हिशोबात सांगायचं म्हणजे दररोज सुमारे 80 हजार फूटबॉलच्या मैदानांइतकी अरण्यं वृक्षतोडीमुळे

गायब होत आहेत. आपल्या देशातही अशी वर्षारण्यं आहेत. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अंदमान, निकोबार, लक्षद्वीपची बेटं, तामिळनाडू राज्यातील समुद्रालगतच्या भागातील अरण्यं, आसाम आणि पूर्वेकडील इतर राज्यांतही अशी अरण्यं आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आपली जैवविविधता आजपर्यंत तरी ती सांभाळून आहेत. कर्नाटकातील अगुंबेजवळचं वर्षारण्य असंच दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांनी समृद्ध आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment