Sunday 16 August 2020

अजिंक्यवीर रायबा तानाजी मालुसरे आणि पारगड किल्ला

आपल्या पराक्रमाच्या जोरावर इतिहासात अजरामर झालेलं एक नाव म्हणजे शिवरायांचे बाल सवंगडी ते मरणोत्तर छत्रपतींची राजेशाही कवड्याची माळ मिळवणारे कोंढण्याचा सिंहगड करणारे 'नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे' हे नाव लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणाला माहीत नसेल तर नवलच!

अशा या शूरविराचा मुलगा म्हणजे रायबा मालुसरे! स्वतःच्या मुलाचे लग्न पुढे ढकलून कोंढाणा घेण्यासाठी गेलेले सुभेदार स्वराज्याच्या कामी आले त्यानंतर शिवरायांनी स्वतः उमरठ येथे येऊन रायबांचे लग्न लावले.  इथपर्यंतचा इतिहास सर्वाना माहीत आहे, परंतु इथून पुढे इतिहासात रायबा मालुसरे हे नाव अंधारातच राहिले. लग्नाला स्वतः शिवराय माँसाहेब जिजाऊ यांच्या सोबत लग्नाला हजर होते. त्यांनी रायबाला सोन्याचे कडे दिले व रायबाची पत्नी जनाई यांनादेखील सोन्यामोत्याचा हार दिला.  व दोघांना आशीर्वाद दिले.  रायबा हे वाढत्या वयानुसार तलवारबाजी व युद्धकौशल्य यामध्ये तरबेज झाले. ते शूर व धाडसी होते. त्यांचे हे शौर्य पाहून छत्रपतींनी त्यांना पायदळाच्या सरनौबत पदाची जबाबदारी दिली. राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण मोहिमेत रायबा हे शिवरायांच्या सोबत होते. मोहीम उरकून माघारी येताना सध्याचा 'पारगड'चा डोंगर शिवरायांना दिसला. त्यांनी तिथे किल्ला बांधला व वास्तुशांती करून त्याचे नाव 'पारगड' असे ठेवले.

स्वराज्यतला पार टोकाचा शेवटचा किल्ला म्हणजे पारगड, घनदाट जंगल, हजारो दुर्मिळ वनस्पती, वन्यप्राणी आणि अजून हि अस्पर्शित असलेले कित्येक जीव अशा ह्या निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा नमुना असलेला भागात म्हणजे पश्चिम घाटातील चंदगड (जि. कोल्हापूर) परिसरात पारगड हा किल्ला वसलेला आहे. पारगड हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगांमधील असून समुद्रसपाटी पासून २४२० फूट उंचीवर आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७४ दरम्यान बांधला, पारगड ह्या किल्ल्याला रोमांचक असा शिकलीन इतिहास आहे. या किल्ल्याची वास्तुशांती झाल्यावर शिवरायांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांची 'पारगड' किल्याचा किल्लेदार म्हणून नेमणूक केली. पारगडाची किल्लेदारी मिळाल्यावर मालुसरे घराणे उमरठवरून पारडगला वास्तव्यास आले. आज त्याचे वंशज व्यवसानिमित्त बेळगाव येथे जरी राहत असले तरी त्याचे गडावरील घर अजूनही अस्तित्वात आहे. पारगडची उंची समुद्रसपाटीपासून 3000 फूट आहे. त्या काळातील म्हणजे रायबा मालुसरे यांची काही पत्रे अजूनही उपलब्ध आहेत. मालुसरे घराण्याचे वंशज बाळकृष्ण मालुसरे याच्या संग्रही ती पत्रे आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरे यांना 'पारगड'ची किल्लेदारी सोपविताना 'चंद्रसूर्य असे तो गड जागवावा' असा मजकूर असलेला ताम्रपट दिला. हा ताम्रपट आप्पाजी बिन येसाजी मालुसरे यांच्याकडून ब्रिटिशांनी जप्त करून एनिकेशन ऑफिसमध्ये ठेवल्याचे काही कागदपत्रावरून समजते.  रायबा मालुसरे यांचा ताम्रपट कुठे आहे याचा शोध इतिहासकारांनी घ्यायला हवा. 

जेव्हा महाराजांनी किल्लेदार रायबा आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. किल्ले पारगड हा तेथील मावळ्यांनी १८१ वर्ष अजिंक्यच ठेवला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करून आहेत.

पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताना कुमक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करली. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. 

रायबांनी 60 वर्षे पारगड अजिंक्य ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून त्यांचा गौरव झालाच त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या हातून देखील रायबांचा गौरव झाला. यावरून समजते की अजिंक्यवीर रायबा हे आपल्या पित्याप्रमाणे शूरवीर होते. रायबांच्या मृत्यूनंतर त्यांना मुलगा मुंबाजी यांनी त्यांची समाधी बांधली ही समाधी आजही आपल्याला पारगडावर पाहायला मिळते .धन्य ते रायबा धन्य त्याची स्वराज्य निष्ठा!

No comments:

Post a Comment