Sunday 23 August 2020

नळदुर्गचा किल्ला

126 एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल 114 बुरुजांची दुहेरी तटबंदी यावरूनच नळदुर्ग किल्ल्याची (जि. उस्मानाबाद) भव्यता स्पष्ट होते. या सगळ्याभोवती नदीच्या पात्राचा भलामोठा खंदक आहे. या सगळ्या आक्रमण-संरक्षणाला भेदत पश्चिम दरवाजातून या गडात प्रवेश करता येतो. वळणाकर रचनेत एका पाठोपाठ एक तीन दरवाजे आहेत. यातून जाताना भोवतालचे तट-बुरुज,पहाऱ्याच्या चौक्या पाहत असतानाच आपल्याला भल्यामोठ्या तोफा नजरेस पडतात. ढालकाठीच्या बुरुजावर चढलं की, संपूर्ण गड नजरेत येतो.

नळदुर्ग चालुक्यांनी उभा केला. राजा नल आणि दमयंती यांचाही संदर्भ इथले लोक सांगतात. चालुक्यानंतर बहामनी राजवट आली. नंतर बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर इथे विजापूरची आदिलशाही आली. सुलतान अबूल मुजफ्फर अली आदिलशहा पहिला याने इसवी सन1560 मध्ये ख्वाजा नियमतुल्लाह याच्या देखरेखीखाली गडाला आजचे हे आक्रमक रूप आले. यावेळीच गडाला 'शहादुर्ग' नाव देण्यात आले. पण इतिहासाला हे नवे नाव फारसे रुचले नाही. पुढे हा नळदुर्ग किल्ला आदिलशहानंतर मोगल आणि पुढे हैद्राबादच्या निजामाकडे आला. याच काळात 2 जानेवारी 1758 मध्ये मराठयांचा झेंडा फडकला. पण काही काळच. पुन्हा निजामशाहकडे गेलेला किल्ला शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस कारवाईमध्ये मुक्त झाला आणि एक राष्ट्रीय स्मारक बनला.

पाच- सहाशे वर्ष जुना असलेला किल्ला भलामोठा आडवा-तिडवा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची गर्दी असलेला आहे. सुरुवातीलाच हत्तीखान्याची भलीमोठी इमारत आणि त्याच्या दारातील हत्तीशिल्पे पाहण्यात येतात. त्यानंतर मग मुंसिफ कोर्ट आणि जामे मशीद लागते. यातील मुंसिफ कोर्ट हा मूळचा किल्लेदाराचा वाडा. पुढे निजामाच्या राजवटीत याचे कोर्ट झाले. आता इथे पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. इमारतीच्या मधोमध एका मोकळ्या चौकात एक महत्त्वाचे फारसी शिलालेख, काही कोरीव दगडशिल्प, नगाऱ्याची लोखंडी पात्रे ,पंचधातूची तोफ आणि असंख्य तोफगोळे पाहायला मिळतात. गडाच्या पूर्व दिशेला धान्य,दारूची काही कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध आणि त्यामागचा नऊ पाकळ्यांचा नवबुरुज आहे. गडाच्या मध्यावर आल्यावर रंगमहाल, बारादरी, राजवाडा,राणीमहाल या वास्तू पाहता येतात. राजवाड्याच्या एका दिंडी दरवाजातून जाताना नळदुर्गचा आत्मा असलेल्या पाणीमहालाचे दर्शन घडते. पाणीमहालात आणि या गूढ, अद्भुत अशा चिरेबंदी वास्तूचे सारे सौंदर्य ते त्याच्या अंगावरून धावणाऱ्या पाण्यात आहे. नळदुर्गच्या उत्तरेकडून बोरी नदी वाहत येते. ती उत्तर-पूर्व दिशेने गडाला वेढा घालत दक्षिणेकडे पुढे निघून जाते. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment