Thursday 13 August 2020

विश्राम बेडेकर

मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट करणारे ,चित्रपट निर्माते ,प्रसिद्ध कादंबरीकार कै विश्राम बेडेकर यांची आज जयंती. 'रणांगण' हि त्यांची खूपच गाजलेली कादंबरी आहे. त्यांचा जन्म विदर्भातील अमरावती येथे १३ ऑगस्ट १९०६रोजी झाला. त्यांचे  शिक्षण अमरावती आणि नागपूर येथे झाले. एम्‌. ए. एल्‌एल्‌.बी. पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. 'एक झाड आणि दोन पक्षी' याला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९८८ साली मुंबई येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचनीअध्यक्षपद भुषविले.मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले 

प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले. १९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत.

१९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१), वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर (१९८०) ही नाटके लिहिली. तथापि बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरलेल्या रणांगण (१९३९) ह्या कांदबरीवर मुख्यतः अधिष्ठित आहे.  त्यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.

No comments:

Post a Comment