Sunday 23 August 2020

उदयगिरी, खंडागिरी गुफा

ओरिसा राज्यातील भुवनेश्‍वरच्या विमानतळापासून केवळ नऊ ते दहा किलोमीटरवर उदयगिरीच्या खंडागिरी या प्राचीन गुंफा असून कल्लिंग चक्रवर्ती राजा खारवेल यांनी या गुफांची निर्मिती केली आहे. 

मौर्य साम्राज्याचे पतन झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली असलेली काही राज्ये परत एकदा स्वतंत्र झालीत व त्यात कल्लिंग हे राज्य होते. राजा खारवेल हा चेदी वंशातला तिसरा शासक नरेश होता.  केवळ चोवीसाव्या वर्षी तो कल्लिंगच्या सिंहासनावर आरुढ झाला होता. त्यानंतर त्याने दिग्विजयाला सुरुवात केली व अनेक राज्ये जिंकले. यात सातकर्णी प्रथम, विद्याधर तीर्थ मुक्ती, गौरवगिरी दुर्ग, राजगृह , गंगाघाटी, मगध यांचा पराभव करून विजय मालिका सुरू ठेवली व कधी मागे वळून बघितले नाही. त्या नंतर खारवेलने राजसूय यज्ञ केला व राजा खारवेल हा राजा चक्रवर्ती झाला. प्रजेच्या हिताकरिता त्याने कधी खर्चाची चिंता केली नाही. दुसर्‍या धर्माचा कधी द्वेष केला नाही. मंदिर, नहर, भवन यांची निर्मिती करून कल्लिंगच्या कष्टाळू जनतेला करमुक्त केले. संगीत, नाटक, सामूहिक पक्वान्न व नृत्याचे आयोजन जनतेकरिता करून महाविलय-प्रासाद हे भव्य दिव्य राजभवन बांधले. आणि याच मालिकेत राजा खारवेल ने खंडागिरी व उदयगिरी या समोरासमोर असणार्‍या उंच पहाडांवर तपस्वी, मुनी, साधु यांच्या तपश्‍चर्ये करिता व निवासाकरिता अनेक लहान मोठय़ा गुंफाची निर्मिती केली व भूमी दान केले. दोन्ही उंच पहाडांवर असलेल्या या गुंफा आज पर्यटकांचे प्रचंड आकर्षण झालेल्या आहेत. या गुंफा प्राकृतिक अवस्थेत आहेत व गुफांच्या निर्मितीमुळे काहीशी कृत्रिमता जरी आलेली असली तरी नैसर्गिक सौंदर्याला कुठलीही बाधा पोहोचलेली नाही असे प्रकर्षाने जाणवते. उदयगिरी पहाडाच्या पायथ्यापासून तर शिखरापर्यंत लहान लहान आकाराच्या विविध गुंफा म्हणजे बिना दरवाज्याच्या लहान ठेंगण्या खोल्या असेच वर्णन करता येईल. या गुंफेत उभे राहता येत नाही इतक्या ठेंगण्या या गुंफा आहेत. या पसरलेल्या पहाडात एक मनुष्य बसू शकेल इतक्याच जागेवर या गुंफा तयार केल्या आहेत. विशाल दगड व प्रचंड मोठय़ा शिला असलेल्या पहाडांवर रम्य वनश्री, माकडांच्या टोळ्या, असंख्य पशुपक्षी यांचा सतत विहार असतो. उदयगिरीमधे अशा एकूण प्रमुख अठरा गुंफा आहेत तर खंडागिरीमध्ये एकूण पंधरा गुंफा आहेत. उदयगिरीची ऊंची १३५ फुट असून खंडागिरी ११८ फुट उंच आहे. याच ठिकाणी राजा खारवेल निर्मित सहा दगडी हत्ती असलेल्या तीन हाथी गुंफा आहेत व मगध भाषेतला अद्भुत अभिलेख आहे. या अभिलेखात चौदा पंक्तिमध्ये खारवेल साम्राज्याचा तेरा वर्षांचा संपूर्ण इतिहास कथन केला आहे पण साम्राज्य अस्ताचा उल्लेख नाही. हा अभिलेख कुणी लिहिला हे अज्ञात आहे. इतिहास, वास्तू व स्थापत्य कला, धर्म, यांच्या दृष्टीने या शिलालेखाला प्रचंड महत्व आहे. राजा खारवेलच्या संपूर्ण शासन काळाच्या जवळपास प्रत्येक वर्षाचा इतिहास या शिलालेखात कोरून ठेवलेला आहे. महत्वाचे म्हणजे आजही हे शिलालेख व दगडी शिला कापून तयार केलेल्या लहान मोठय़ा गुंफा अत्यंत सुस्थितीत आहेत. हाथिगुंफानंतर पहाड उतरून खालच्या बाजूला विशाल परिसरात गुंफाचा समूह बघायला मिळतो. कलात्मक्तेने सजलेल्या दुमजली राणी गुंफा आहेत. येथे तीन प्रवेशद्वार भव्य परिसरात असून सारे कक्ष एकमेकांना लागून आहेत. मंत्रोच्चाराचे ध्वनि संतुलन नाट्याचे लोकरंजनाचे प्रयोग येथे होत असत अशी माहिती मिळाली. येथल्या भिंतींवर वास्तूकला, नर्तकी, सूर्यरथ, सुंदर चित्रे, तोरण, जीवजंतु, धार्मिक व राजेशाहीची भित्तिकला चित्रित केली आहे. खारवेल नरेशचे विजय अभियान, त्यांची यात्रा ,सजवलेल्या हत्तींच्या मूर्ती व शकुंतला व राजा दुष्यंत यांची पहिली भेट, कलात्मक स्तंभ,अशी अनेक दृश्ये व नृत्यकला दगडी शिल्पात चित्रित केलेली आहेत. हाथिगुंफा येथील शिलालेखात या उदयगिरी पर्वताचे वर्णन कुमारी पर्वत असे केले आहे. दरवाजा सारखे मुख असलेल्या या गुंफांना लेणा म्हटलेले आहे. ई.स.पूर्व दुसर्‍या शतकातल्या या गुंफा असून कल्लिंगमधल्या जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव येथे प्रामुख्याने दिसून येतो.
ई.स.पूर्व २0९-१७0 या काळात कल्लिंग नरेश खारवेल यांनी गुंफाची निर्मिती केली असे मानण्यात येते. या व्यतिरिक्त अनेक छोटे छोटे गुंफाकक्ष निर्माण केलेत. येथील प्रत्येक गुंफा विशिष्ट नावाने ओळखल्या जाते. यात अलकापुरी,जयविजय, पन्नासा, ठाकुरानी, पातालपुरी, मंचापुरी, स्वर्गपुरी, गणेशगुंफा, जंबेश्‍वर, व्याघ्र गुंफा, सर्प गुंफा, धनागर, हरीदास, जगम्मठ गुंफा व रोसाई गुंफा या नावाने प्रसिद्ध आहेत. तर काही गुंफा जैन साधू यांनी निर्माण केल्या असेही मानण्यात येते.


No comments:

Post a Comment