Saturday 15 August 2020

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विचार

*जे जीवनाचा नैवेद्य दाखवतात तेच इतिहास घडवू शकतात. जे ध्येयवादी, निश्चयी, करारी आणि निर्व्यसनी युवक आहेत तेच इतिहास घडवू शकतील. जे जे उन्नत आहे ते युवकांच्या हातूनच घडणार आहे.

*विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान, ध्येयवादी माणसांचीच भाषणं ऐकली पाहिजेत.तत्त्वनिष्ठ माणसांचेच विचार ऐकले पाहिजेत त्यातून सुसंस्कारित होऊन चांगले विद्यार्थी, युवक तयार झाले पाहिजेत.

*व्यक्तिमत्त्व हे एक मूल्य आहे.प्रत्येकाने ते सांभाळले पाहिजे.

*मी ईश्वर मानतो पण दर्शनासाठी रांगेत कधी उभा राहत नाही.देवपण मी मानतो आणि देव हा प्रकाशासारखा प्रकट होऊ शकतो. देव हा असा कुठे साठवून ठेवता येत नाही पण तो आठवून प्रकट करता येतो. 

*तारुण्य हरवू नका.उत्साह गमावू नका.प्रौढत्व टाळू नका. ज्येष्ठत्व हा जीवनाचा कळस आहे हे विसरू नका. जीवनाच्या सर्व आवस्थांचा आनंदाने स्वीकार करा. जीवनाला रंग,रूप, रस आणि गंध आहे.त्याच्या अभिव्यक्तीत आनंद आहे. तपामुळे प्राप्त होणारी निर्भयता ,सरलता हीच खरी सुंदरता होय.

*माणूस जोपर्यंत तृष्णामुक्त होत नाही तोपर्यंत दु:खमुक्त होऊ शकणार नाही. माणसाने निर्मळ जीवन जगावे.जे आपले नसेल त्यावर हक्क सांगू नये. हा शांतीचा मार्ग आहे. नवी ज्ञानेश्वरी सांगता आली नाही तरी ज्ञानेश्वरीची थोरवी तरी सांगावी असे मी मानतो. ज्यांना पैशांचा मोह पडत नाही तेच इतिहास घडवतात आणि दरिद्री लोक द्रव्याची देखभाल करीत बसतात. माणसामाणसांमध्ये तारतम्य शक्ती असली पाहिजे. माणसाच्या मनामध्ये  विचाराबरोबर अविचारही येत असतो. शेतामध्ये पिकाबरोबर तणही येते. ते काढावे लागते. तसा मनातला अविचारही काढावा लागतो.

*काही निवळ। काही खळबळ। ऐसा कंठीत जावा काळ।। -समर्थ रामदास

*आंब्याला प्रथम मोहोर येतो.मग एक छोटा ठिपका दिसतो. त्याचीच पुढे कैरी होते. कैरीतून रसयुक्त आंबा आकाराला येतो. ही वाटचाल परिपक्वतेच्या दिशेने सुरू असते. माणसे बोलत बोलत आणि लिहीत लिहीत परिपक्व व्हावीत. पक्वता ही गुणवत्तेची परिसीमा आहे. 


No comments:

Post a Comment