Thursday 27 August 2020

चिंतामणी गोविंद पेंडसे


चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे जन्म सांगली येथे २८ ऑगस्ट, १९0६मध्ये झाला. हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठय़ांच्या लक्षात आली होती. मामांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. वडिलांना मासिक साडेबारा रुपये पेन्शन मिळे. घरी परिवार मोठा. संसारास काही मदत करावी या हेतूने मामा पेंटरच्या हाताखालचा गडी या नात्याने वयाच्या अठराव्या वर्षी किलरेस्कर संगीत मंडळीत शिरले. लहानपणापासून पेंटिंगची आवड होतीच. नाटकांतील पडदे रंगवणार्‍या शंकरराव गायकवाडांकडून पेंटिंगचे धडे घ्यावे व नंतर स्वतंत्र पेंटिंगचा व्यवसाय सुरू करावा हा मामांचा उद्देश होता. शिवाय नट व्हायला वडिलांनी परवानगीही दिली नव्हती. नट म्हणजे अशिक्षित, दुराचारी व व्यसनी माणूस अशी तेव्हाची समजूत. मराठी नाटकाच्या जन्मापासून नट मंडळी मिळाली ती आचारी, ताक घुसळणारा, पाणक्या यांसारखी. त्यांच्याबरोबर त्यांची व्यसनेही नाटक मंडळीत शिरली. स्वत:ला साळसूद म्हणवणार्‍या प्रतिष्ठित लोकांनी ही नटांची व्यसने पोसली व त्यांचा गवगवाही केला. जो नाटकात स्त्रीपात्र पाहील त्याला सात जन्म स्त्रीत्व प्राप्त होईल असाही एक लोकापवाद होता. त्या स्त्रीपात्राला काय शिक्षा होती देव जाणे ! अशा या प्रतिष्ठा नसलेल्या व्यवसायात सामील व्हायला वडिलांनी नाकारले नसते तरच नवल. म्हणून मामांनी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. मामांचा दुधाचा व्यवसायही होता. केवळ नाटकांतून मिळणार्‍या बिदागीवर संसार चालवणे शक्य नसल्यामुळे एखादा जोडधंदा असणे त्याकाळी गरजेचे होते. दुधाचा धंदा चालू असतानाच,१९३६ साली मामा पेंडसे यांनी रमेश नाटक मंडळीत प्रवेश मिळवला. त्यांच्या आग्र्याहून सुटका या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे सर्मथ नाटक मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली. एकदा रात्री नऊ वाजता महाटचे यशवंत महादेव ऊर्फ अप्पा टिपणीस यांनी लिहिलेल्या राजरंजनचा प्रयोग होता. दुपारी दोन वाजता बातमी आली की, सय्यद अल्लीची भूमिका करणारे नारायणराव फाटक यांचे एकाएकी ऑपरेशन ठरल्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. सर्वांची बोबडी वळली. आयत्या वेळी कुणाला उभे करायचं हा प्रश्न पडला. अरे तो पेंटरचा गडी पेंडसे फावल्या वेळात नाटकातले उतारे म्हणत असतो; त्याला पाहू या आज उभा करून अशी सूचना आली. मामा तयार झाले सय्यद अल्लीचा पोशाख चढवला, दाढी, मिशी चिकटवली, फेटा बांधला आणि स्टेजवर जाऊन राजाला मुजरा ठोकला. खास नेमलेल्या प्रॉम्प्टरने सांगितलेली वाक्ये मामांनी कशीबशी उरकली आणि एकदाचा विंगेत सहीसलामत सटकले. 

आग्याहून सुटका (उमरखान + जयसिंग), आंधळ्यांची शाळा (विश्‍वनाथ), आशीर्वाद (तात्या), एक होता म्हातारा (नाना -बाबा), कथा कुणाची व्यथा कुणाला (सोमण), कन्या सासुरासी जाये (दादासाहेब), करीन ती पूर्व (शिवाजी), कुलवधू (बाप्पा), कोणे एके काळी (हणमंतराव), खडाष्टक (कर्कशराव + वारोपंत + राघोपंत) चंद्रग्रहण (जगदेवराव), चंद्र नभीचा ढळला (अमात्य), झुंज (बाबासाहेब), तुझे आहे तुजपाशी (आचार्य) तोतयाचे बंड (नाना फडणीस), त्राटिका (प्रतापराव), दुरिताचे तिमिर जावो (पंत), देव नाही देव्हार्‍यात (दादासाहेब), पडछाया (नाना), पंडितराज जगन्नाथ (शहाजहान), पुण्यप्रभाव (भूपाल), बेबंदशाही (कब्जी + खंडोजी +संभाजी), भाऊबंदकी (नाना फडणीस), भावबंधन (घनश्याम), भूमिकन्या सीता (सुमंत), माझे घर (नाना), रणदुंदुभी (जिवाजी), रंभा (अण्णाप्पा), राजरंजन (सय्यदअली), राजसंन्यास (जीवाजीराव कलमदाने) राक्षसी महात्त्वाकांक्षा (कोदंड + दुर्जय), वहिनी (विष्णुपंत), विद्याहरण (युवराज + शुक्राचार्य), वैजयंती (विश्‍वपालकाका), शहा शिवाजी (रणदुल्लाखान), शारदा (श्रीमंत भद्रेश्‍वर दीक्षित), शिवसंभव (जाधवराव) संन्यस्त खड्ग (विक्रमसिह) आदी अनेक नाटकतील भूमिका त्यांनी अजरामर केल्या.

No comments:

Post a Comment