Wednesday 5 August 2020

वृक्षांवाचून जीवन अपुरे...

जगाच्या पाठीवर वृक्षवेलींची अनेक रूपं आहेत. वृक्षांना मित्र,सखा,गुरू म्हणून नेहमीच यथार्थपणे गौरवले जाते. परोपकाराचे आदर्श उदाहरण म्हणून वृक्षांकडे पाहिले जाते. वड,पिंपळ, औदुंबर, तुळस या झाडांना धार्मिक अधिष्ठान आहे तर कडुलिंब, बेल, हिरडा, बेहेडा, आवळा, अर्जुन यासारखी झाडे औषधीदृष्ट्या महत्त्वाची आहेत. गुलाब, शेवंती, जाई, जुई, मधुमालती, कर्दळ, निशिगंध, जास्वंद, अबोली, सदाफुली, झेंडू अशा बागबगीच्यातील झाडांचा बहर जसा डोळ्यांना सुखावतो त्याचप्रमाणे पांगारा, काटेसावर, पळस, बहावा अशा रानातील वृक्षांचा बहरही डोळ्यांचे पारणे फेडतो. आंबा,काजू,फणस, चिंच, बोरं, जांभळं, सफरचंद,पपई, बदाम,पेरू,चिकू, नारळ, डाळींब, सीताफळ,अननस, चेरी, लिची, आलूबुखार, अक्रोड, जर्दाळू ,द्राक्षे असा रसभरीत मेवा आपल्याला वृक्षांकडूनच मिळतो. 

भारताला जी भौगोलिक विविधता लाभली आहे,त्यामुळे प्रत्येक प्रदेशातील वृक्षावल्लींनाही वैविध्य प्राप्त झाले आहे. त्या त्या प्रदेशातील वृक्ष तिथल्या जनजीवनात अगदी मिसळून गेले आहेत. नारळाला कोकण-केरळचा कल्पवृक्ष मानतात. नारळाच्या तेलापासून ते हिरकुंटापर्यंत या झाडाचा प्रत्येक भाग लोकांच्या उपयोगी पडतो. आसाम, विदर्भातील साग, दक्षिण भारतातील चंदन, नैनिताल, काश्मीर, हिमाचलमधील फर, पाईन हे सुचिपर्ण वृक्ष, वाळवंटातील खजुराची झाडे, काश्मिरातील चिनार हे सारे वृक्ष त्या त्या प्रदेशातील कल्पवृक्ष आहेत. वृक्षांशी भारतीय लोकांचे असे नाते जुळले आहे की, वृक्षाला देव मानून त्याची पूजा केली जाते. वृक्ष वाचवण्यासाठी प्राणही देण्याच्या घटना इथे घडल्या आहेत.
राजस्थानमधील बिश्नोई पंथाच्या शेकडो स्त्री-पुरुषांनी खेजडीची झाडे वाचवण्यासाठी इतिहासात केलेले बलिदान अमर आहे. हिमालयात चिपको आंदोलन उभे राहिले. काश्मिरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे प्राचीन चिनार वृक्ष इतिहासाचे मूक साक्षीदार आहे. सांगली जिल्ह्यात 'हायवे'च्या मार्गावर येणाऱ्या चारशे वर्षांपूर्वीचे प्राचीन वडाचे झाड वाचवण्यासाठी नुकतेच आंदोलन झाले आणि शेवटी हायवेचा मार्ग बदलण्यात आला.
भारताच्या विविध भागात अशा वृक्षांच्या रुपातले इतिहासाचे साक्षीदार आपल्याला पाहायला मिळतात. चारधाम यात्रेतील जोशीमठ येथे आदी शंकराचार्य यांनी रुजवलेला ज्ञानवृक्ष आजही ज्ञानसाधनेची ज्योत उजळत उभा आहे. तसेच राजपुत्र सिद्धार्थाचे तथागत गौतम बुद्धात परिवर्तन करणारा बोधिवृक्ष साक्षात्काराचे प्रतीक ठरला आहे. आळंदी येथील अजानवृक्षाचे भाग्य आपल्याला ज्ञात आहेच. या वृक्षाखाली साक्षात ज्ञानियाचा राजा संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतली. म्हणूनच मानवाला अन्न,वस्त्र आणि निवारा देणारे वृक्ष इतिहासाचे साक्षीदारही आहेत. अशा या वृक्षांशिवाय जीवन अपूर्णच आहे, असे म्हणायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012



1 comment:

  1. फोटो ओळ- (सांगली जिल्ह्यात रत्नागिरी-कोल्हापूर- मिरज-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा 400 चारशे वर्षांचा वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इथेच यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वृक्ष आहे.)

    ReplyDelete