Monday 1 March 2021

'रोबोट'चे नाटक


कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) च्या माध्यमातूनही सृजनात्मक लेखन  आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळेल,हा काळ आता काही फार दूर राहिला नाही. यादृष्टीने एक आनंदाची  बातमीही ऐकायला मिळाली आहे,त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एका नाटकाची रचनाही झाली आहे. प्रयागस्थित चार्लेस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही किमया साकार करून दाखवली आहे.'एआय: वेन अ रोबो राइटस अ प्ले' नावाच्या या नाटकात एका रोबोची प्रवास कथा मांडण्यात आली आहे. एक असा रोबो, जो समाज, मानव भावना आणि इतकेच नव्हे तर मृत्यूबाबत जाणून घेण्यासाठी जगाच्या प्रवासाला निघाला आहे. आणखी एक विस्मयकारी गोष्ट म्हणजे स्वतः रोबो हा शब्द देखील शंभर वर्षांपूर्वी एका चेक लेखकाने- करेल कॅपने त्याच्या नाटकात पहिल्यांदा वापरला होता.नाटकात निर्माण झालेल्या रोबोनेदेखील आता आपले पाहिले नाटक लिहिले आहे.

वास्तविक या नाटकाचे लेखन एका एआय सिस्टम जीपीटी-2 च्या साहाय्याने लिहिण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सुरुवातीला फेक न्यूज, लहान गोष्टी आणि कविता लिहिण्यासाठी केला गेला आहे. तूर्तास या एआय सिस्टमला बाहेरच्या मदतीची खूप गरज पडत आहे. आता भाव आणि कथेच्या स्तरावर ही सिस्टीम भरकटत आहे. जसं की, रोबोट लिहिता लिहिता हे विसरून जातो की नाटकाचा नायक रोबो आहे. याशिवाय रोबोटला लिंगभेदाबाबतही समस्या आहे. पात्र स्त्री आहे की पुरुष आहे, हे तो कसा जाणतो, हेही कळायला मार्ग नाही. कदाचित येणाऱ्या पुढच्या काळात रोबोट किंवा एआयचेही लिंग निश्चित करावे लागेल. लैंगिक फरकाबरोबरच भाषादेखील बदलते, पण रोबो किंवा एआय अजूनही यावर काम करताना दिसत नाही. रोबोटने आता जे नाटक लिहिले आहे, ते त्याच्या तार्किक प्रवासापासून भरकटले आहे. आता जी परिस्थिती आहे, त्यावरून असे वाटते की, एआय सिस्टीम पाहिल्यापासून उपलब्ध असलेल्या माहिती आणि लेखनाचे मिश्रण करण्यात सक्षम आहे,पण त्याची बुद्धी अजून सृजनात्मक पद्धतीने विचार करू शकत नाही. माणसाला नाटकाची जाणीव झाली होती, त्यामुळे त्याने नाटके लिहिली. पण एआयला नाटक लिहिण्याची कधी गरज वाटली नाही. रोबोटला तर माणसाच्या डोक्यानुरूपच काम करावे लागणार आहे. परंतु तरीही आपण ही आशा करू शकतो की, एआय किंवा रोबो येणाऱ्या काळात मानवीय भावना, विचारधारा, भाषा, चेतना,लिंगभेद इत्यादी ज्ञानाच्या जोरावर चांगले लेखन करू शकेल.

शास्त्रज्ञ किंवा जाणकार हे जे नाटक लिहिण्यात आले आहे ते पूर्णपणे एआयची निर्मिती असल्याचे मानायला तयार नाहीत. ते म्हणतात- मानवाच्या जटिल भावनांना समजण्यासाठी आणि सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत समन्वयाच्या साथीने संतुलित लेखनाला सक्षम होण्यास औद्योगिकदृष्ट्या अजून पंधरा वर्षे लागतील. आता जे नाटक रचण्यात आले आहे, त्यामुळे लोकांचा उत्साह मात्र  वाढला आहे. त्यामुळे पुढचा मार्ग तयार झाला आहे. खरे तर एआयने लिहिलेले नाटक प्रेक्षकांसाठीदेखील आव्हानात्मक असणार आहे. या नाटकाची परियोजना सादर करणाऱ्या आवक उद्योजक आणि एआयचे प्रशंसक टॉम स्टेडिनिक नाटकाच्या एका विशेष दृश्याचा उल्लेख करतात, ज्यात एक मुलगा रोबोटला एक चुटकुला ऐकवायला सांगतो. रोबोट ऐकवतो- ज्यावेळा तू मोठा होशील, मरून जाशील, पुढे जाऊन तुझी मुलं, नातवंडदेखील मरून जाशील,पण तेव्हा मी मात्र इथेच जवळपास असेन. साहजिकच यांत्रिक रोबोट कधीच मरणार नाहीत आणि त्यांची बुद्धिमत्ता माणसाला नेहमीच चक्रावून टाकत राहील. आता तर अजून सुरुवात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. 

No comments:

Post a Comment