Friday 5 March 2021

महाराष्ट्राचं लेकरू :शेकरू


महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला दैनंदिन जाणारा 'शेकरू' किंवा 'इंडियन जायंट ही स्क्विरल' म्हणजेच झाडावर राहणारी मोठी  खारूताई शेकरू हे सलग, समृद्ध आणि  घनदाट जंगलाचे उत्तम निर्देशक आहे. जगभरात मोठ्या खारिच्या चार प्रजाती आहेत, त्यातील शेकरू (रातुफा  इंडिका) हे फक्त भारतात सापडतात. महाराष्ट्रात पश्चिमघाटात सह्याद्रीच्या रांगांमध्ये,  महाबळेश्वर, भीमाशंकर, फणसाड, आंबा घाट, ताम्हिणी,  वासोटा आणि इतर काही परिसराच्या सदाहरित, निम  सदाहरित व नदीकाठच्या जंगलात व मेळघाटच्या आणि गडचिरोली मधल्या चपराळा जंगलात शेकरू आढळतात. दोन ते अडीच किलो वजनाचे, सुंदर तपकिरी रंगाचे  आणि झुबकेदार लांबलचक शेपूट असणारे शेकरू  अतिशय देखणे दिसते. पण ते फारच लाजाळू असल्याने क्वचितच जमिनीवर येते. ते त्यांची हालचाल एका झाडावरून ते जवळच्या दुसऱ्या झाडावर उड्या मारून करतात. त्यांच्या ह्याच सवयी साठी त्यांना घनदाट आणि सलग जंगलाची गरज असते. निसर्गगान शेकरू नर असो किंवा मादी ते एकाकी राहणं पसंत करतात आणि त्यांचा परिसर क्षेत्र आणि हद्द जपतात. नराच्या परिसरक्षेत्र हद्दीत मादीच्या हद्द मिसळू शकते. ते त्यांच्या अन्न आणि घरट्यांसाठी हा परिसर राखून ठेवतात आणि त्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक घुसखोरे शेकरूला पळवून लावतात. शेकरू हा शाकाहारी प्राणी  आहे आणि फळ, बिया, फुल, कोवळी पानं आणि  झाडाची मऊ साल हे त्यांचे आवडीचं खाध आहे. शेकरू एक दिवाचर प्राणी आहे आणि दिवसभराच्या अन्न शोधणे, खाणे आणि आरामच्या कार्यकालापानांतर ते सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घरट्यात परततात. प्रत्येक शेकरू स्वत:च्या हद्दीत ७-८ घरटी तयार करतो. ही घरटी घुमटाकार आकाराची, काड्यांनी व पानांनी बनलेली असतात.

घरट बनवणं आणि त्याची देखरेख करणं हे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ही घरटी शेकरूला कडक उन्हापासून, पावसापासून आणि शिकाऱ्यापासून संरक्षण देतात. अश्या काही घरट्यांमध्ये पावसाळ्या आधी शेकरू बिया साठवून ठेवतात. घरट्यात दुपारच्या वेळेला निवांत विश्रांती घेत असलेल्या शेकरूची आकाशात उडणाऱ्या गरुडाला भनक सुद्धा लागत नाही. शेकरूंची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांमध्ये मुख्यतः काळा गरुड, सर्पगरुड, साप, बिवटा आदी आहेत. शेकरुंचा वर्षातून एकदाच विणीचा हंगाम असतो, एक मादी एकाच पिल्लाला जन्म देते आणि साधारण दहा महिन्यापर्यंत त्याचे संगोपन करते. त्या नंतर हे पिल्लू स्वत:च घरटं बांधायला शिकतं आणि स्वत्रंत राहायला लागतं. आपल्या महाराष्ट्रात शेकरूच्या संवर्धनासाठी भीमाशंकर अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. आणि त्यांच्या साठी इथे परिपूर्ण अधिवास आहे, महाराष्ट्र वनविभाग शेकरू संवर्धनामध्ये उत्तम काम करत आहे आणि बऱ्याच संरक्षित क्षेत्रात त्यांचा आकडा वाढत आहे. पण इतर ठिकाणी जिकडे शेकरूचं वास्तव्य होतं किंवा काही प्रमाणात शिल्लक आहे तिकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बेसुमार जंगल तोडीने त्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. तसं शेकरू फळं आणि बिया खाऊन वनांचा आपोपाप प्रसार आणि वृद्धी करतात. त्यांना फक्त गरज आहे ते त्यांच्या अधिवास संरक्षणाची.

No comments:

Post a Comment