Sunday 7 March 2021

पंचकन्या

महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे.


एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी लढणे- झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती याप्रकारे पाहावयास मिळत आहे.

स्त्री-भ्रूण हत्येच्या कलंकित गोष्टी अनेकदा ऐकावयास मिळतात. त्याचवेळी समाजात मुलींना जन्म देऊन प्रसन्नपणे सांभाळणारी आईदेखील पाहावयास मिळत आहे. अशी बरीचशी कुटुंब आपल्या जवळपास सापडतील की ज्यांना फक्त एकच मुलगी आहे किंवा दोघीही मुलीच आहेत. आणि त्या आई-वडिलांच्या लाडक्या आहेत. त्या आई-वडिलांचीही काळजी घेत आहेत.

मुलींना दत्तक घेऊन त्यांचे अगदी प्रेमाने पालन-पोषण करणारीही कुटुंब आहेत. आज जवळपास सर्वच सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कर्जदेखील घेतले जात आहे. मुली शिकून काय करणार? शेवटी त्यांना चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे अशा रूढीवादी परंपरा झुगारून देऊन लग्नाआधीच त्यांना शिक्षण देणे, आत्मनिर्भर करणे ही मानसिकता विकसित झाली आहे.

मुलीच्या घरचे पाणीही वज्र्य मानणार्‍या समाजात लोकं मुलीच्या घरी येऊन राहू लागली आहेत आणि त्यांच्याकडून भेटवस्तूदेखील प्रेमाने आणि गर्वाने स्वीकारू लागली आहेत.

मुलींना कायद्याने संपत्तीत अधिकार तर मिळालेच आहेत पण वडीलही तिला आपल्या संपत्तीचा अधिकार देऊ लागले आहेत. समजदार भाऊदेखील त्यात सहकार्य करीत आहेत.

लग्नासाठी 'वर' पसंत करताना तिच्या मतालाच प्राधान्य दिले जात आहे. उच्च शिक्षणासाठी मुली लहान-लहान शहरातून मोठय़ा शहरांमध्ये येऊन राहणे, नोकरी करणे, आपली ओळख निर्माण करणे यामुळे त्यांचा आत्मविश्यास वाढीस लागला आहे. आपल्या देशातच काय पण विदेशात जाऊ लागली आहे. आत्मविश्‍वासासोबतच आपले मत ठामपणे मांडणेही ती शिकली आहे. घराच्या संरक्षण कवचातून बाहेर येऊन तिने अभिव्यक्ती स्वातंत्र स्वत:च मिळविले आहे. आजची आधुनिक तरुणी अन्यायाचा विरोध करण्याच्या परिणामांना न जुमानता अन्यायाचा विरोध करते आहे. आजची स्त्री खर्‍या अर्थाने सखी-सहचारिणी बनली आहे. ती पतीची दु:ख वाटून घेण्यातही सक्षम झाली आहे. ती पत्नी बनून फक्त त्याने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. शिक्षित आणि घराबाहेर जाऊन कमावू लागलेली आजची आई मुलांप्रतीही अधिक जागरूक आणि संवेदनशील बनली आहे. मुलांचे पालन-पोषण करतानाच ती त्यांना निर्णय घेण्यातही भागीदार बनली आहे. मुले ही आपल्या आईच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू लागली आहेत.

आजची स्त्री खर्‍या अर्थाने सासरसंबंधी आपले कर्तव्य पूर्ण करीत असताना माहेराप्रती असणारे कर्तव्यही पार पाडीत आहे. 'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते' हा कलंक देखील तिने पुसून टाकला आहे. सासू-सून यांच्यातील युद्ध आता फक्त टी.व्ही. मालिकांमधूनच पाहावयास मिळत आहे. कारण आजच्या सासू सुना एकमेकांच्या वैरी नाही तर मैत्रिणी बनल्या आहेत.

अनेक मातांना वाढत्या वयाच्या मुलीची भलतीच चिंता वाटत असते. आपली देखणी तरुण मुलगी बाहेर जाते, हिंडते, नोकरी करते. अनेकांच्या वेगवेगळ्या नजरांचा विषय बनते. हे सारं तिला माहीत असतंच; पण त्या नजरांचा योग्य सामना करायचं आणि त्यातून सुरक्षित राहायचं बळ तिच्यात आहे की नाही याविषयी मात्र तिला नेहमीच शंका असते. शिवाय आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या या मुलींना नेहमीच वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

कामाच्या अनियमित वेळा, कामानिमित्त पुरुष सहकार्‍यांबरोबर हॉटेलिंग, प्रवास, त्यांच्या बरोबरीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा यामुळे निर्माण होणारे तणाव या मुलींसाठी अडचणीचे ठरत असतात. अशावेळी आईने मुलीची जवळची मैत्रीण बनून राहणे आवश्यक ठरते. तिच्या मनात शिरणे, तिच्या प्रश्नांविषयी मोकळेपणाने चर्चा करणे, कामाचे स्वरूप नीट जाणून घेणे आणि संशयाची सुई न रोखता तिच्या सर्व पुरुष आणि स्त्री सहकार्‍यांविषयी माहिती करून घेणे हे आजच्या आईचे काम आहे. आपले स्त्री असणे इतरांच्या डोळ्यांत खुपू न देता हुशारीने जपणे तिला समजावून देणे आवश्यक ठरते. धोके न पत्करणे, फाजील आत्मविश्‍वास न बाळगणे आणि समोरच्या व्यक्तीवर आंधळा विश्‍वास न ठेवणे हे खबरदारीचे उपाय तिला सांगणे गरजेचे आहेच; पण स्वत:चे काम पूर्ण विश्‍वासाने करणे आणि चुकांची पुनरावृत्ती टाळत स्वत:ला सिद्ध करणे आवश्यक आहे हे ही तिला सांगायला हवे. आई आणि मुलीच्या नात्यात मोकळेपणा हवा. आयुष्यात निर्माण होणारे खाचखळगे नीट ओलांडता आल्यास पुढे सुंदर भविष्य वाट पाहात आहे यांची नीट जाणीव मुलींना द्यायला हवी. प्रसंगी त्यांचे विचार समजून घेऊन नव्या परिस्थितीच्या दृष्टीने ते योग्य असतील तर स्वीकारायलाही काही हरकत नसते.आजकाल तर स्त्रीसमोर असुरक्षिततेचे संकट उभे असते. स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, मोहाला बळी न पडता योग्य मार्गावर कसे राहायचे याबद्दलही प्रेमाने, विश्‍वासाने सतत सांगत राहायला हवे. तरच आपल्या मुली सुरक्षित आणि समक्ष आयुष्य पेलू शकतात. स्त्री ही अनंत काळाची माता आहे. ती मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी आणि आई या सर्वच भूमिका सक्षमपणे पार पाडते. एक दिवसाचा महिला दिन साजरा करून काही होणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्री ला कायमच मोठेपण दिले आहे. भारतीय संस्कृतीत ज्यांचे नित्य स्मरण करायला सांगितले आहे त्या पंचकन्या मातृत्वासाठी किंवा पत्नित्वासाठी नाही तर त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी जनमानसात लोकप्रिय आहेत.

अहल्या द्रौपदी सीता

तारा मंदोदरी तथा।

पंचकन्या: स्मरेन्नित्यं

महापातकनाशिनी:॥

असा हा पूर्वापार चालत आलेला आहे. या पंचकन्यांचे नित्य स्मरण केले तर महापातकाचा नाश होतो हा त्याचा अर्थ. रामायण, महाभारतातल्या या स्त्री-व्यक्तिरेखा सार्‍यांच्याच आदर्श आहेत. जनसामान्यांच्या स्मरणातून, त्यांच्या र्शद्धेचा विषय बनून राहिल्यात.

अहल्या

अ+ हल म्हणजे नांगरणे. अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. हा अर्थ अहल्या या व्यक्तिरेखेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. त्या आधी आपण अहल्येचे रामायण वा इतर साहित्यातील चित्रण पाहू. अहल्येची उत्पत्ती-कथा रामायणाच्या उत्तरकांडात येते. ब्रह्मदेवाने सजीव सृष्टीमधील सर्वात सुंदर स्त्री निर्माण केली तिचे नाव त्याने अहल्या असे ठेवले. अहल्या याचा अजून एक अर्थ निर्दोष असा आहे. जिचे सौंदर्य वादातीत आहे, निर्दोष आहे ती अहल्या. त्याने तिला गौतम ऋषींजवळ सोपवले. ती वयात आल्यानंतर गौतम ऋषींनी तिला परत ब्रह्मदेवाकडे आणले. गौतम ऋषींनी अत्यंत मायेने, संयमी राहून तिचा सांभाळ केला हे बघून ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी गौतम ऋषींना अहल्येचा भार्या म्हणून स्वीकार करण्यास सांगितले. अशा रीतीने अहल्या गौतम-पत्नी झाली.

द्रौपदी

राजा द्रुपदाची कन्या. पुत्रकामेष्टी करत असताना यज्ञनारायणाने दिलेली कन्या. अयोनिजा, श्यामला, नीलपद्मगन्धा, बुद्धिमती, रुपगर्वीता द्रौपदी, महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र. तिची कथा आपल्याला माहीत आहेच. सासूच्या-कुंतीच्या आ™ोने बहुपतित्व स्वीकारावी लागणारी पाची पतींना समत्वाने ममत्व देणारी, समद्गपत होणारी एक तरुण, रूपगर्वीता, आपल्या पाचही पतींचे गुणदोष जाणून असणारी द्रौपदी म्हणजे पांडवांना बांधून ठेवणारा, त्यांच्यातले पौरुषत्व जागे ठेवणारा धागा आहे. महाभारतात आपल्या मेधावी बुद्धिमत्तेने, कटू वाग्बाणांनी तीक्ष्ण प्रहार करत ईप्सित हेतू साध्य करते. पाचही पतींची भार्या असूनही तिचे स्त्री-पावित्र्य अबाधित आहे.

द्रौपदीचे अजून एक विलोभनीय रूप म्हणजे तिचे कृष्णाशी असलेले नाते. तिचे सखी रूप स्त्रीमनाला भुरळ घालते. द्रौपदी अबला नाही तर एक सशक्त, स्वतंत्र, विचारी, स्त्रीत्वाची ताकद असलेली, त्याचा पुरेपूर नि योग्य वेळी वापर करणारी एक आदिशक्ती आहे.

सीता

रामायणाची नायिका, भूमिकन्या, अयोनिजा, शालीन, बुद्धिमती, संस्कारी, स्वतंत्र, सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. वेदकाळात नांगरणीच्या वेळी यज्ञ करीत असत. म्हणून नांगरताना सापडलेली कन्या म्हणून तिचे नाव जनकाने सीता ठेवले. सीतेची व्यक्तिरेखा जी आपल्याला संस्कृत साहित्यातून आणि लोकसाहित्यातून कळते ती थोडीशी परस्परविरोधी आहे. रामायणव्यतिरिक्त संस्कृत साहित्यातील सीता ही आदर्श भारतीय नारी अशा स्वरूपाची आहे तर लोकसाहित्यात सीतेचे स्त्री रूप, तिला स्त्री म्हणून भोगावे लागलेले दु:ख, तिची फरफट अधोरेखित करणारी आहे. रामायणातील सीता ही जास्त वास्तववादी आहे. ती भारतीय स्त्रीचे खरे रूप आहे. शालीन, बुद्धिमती, संस्कारी, जमिनीशी नाते सांगणारी, शिवधनुष्याशी लीलया खेळणारी, बहिणींशी मैत्रिणीचे नाते असणारी, सासरी सर्वांची मने जिंकणारी, पतीवर नितांत, अतूट र्शद्धा, प्रेम असणारी अशी आहे. सीतेचे अजून एक रूप आहे जे रामायणात दिसून येते ते म्हणजे बुद्धिमान, धर्मकार्य जाणणारी, कर्तव्यनिष्ठ, स्वतंत्र विचारांची स्त्री. वनवासकाळात अथवा लंकेच्या विजनवासात आणि नंतर उत्तरकांडात तिचे हे रूप प्रकर्षांने जाणवते.

तारा

वाल्मिकीने रामायणात तत्कालीन समाज रंगवताना सर्वच पात्रांच्या गुणदोषासहित असलेले त्यांचे स्वतंत्र अस्तित्व रंगवलेले आहे. तारा ही अशीच स्वतंत्र अस्तित्व असलेली सशक्त स्त्री व्यक्तिरेखा. ती अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेली, राजनीती निपुण, आत्मभान असलेली स्त्री आहे. जेव्हा सुग्रीवाचा वालीने पराभव करताच सुग्रीव लगेचच पुन्हा वालीला ललकारत असतो तेव्हा तारा संभाव्य धोका ओळखून वालीला युद्धभूमीवर जाण्यास परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण वाली तिला न जुमानता युद्धासाठी जातो आणि वीरगतीस प्राप्त होतो. केवळ अंगदाला त्याचे राजगादीचे हक्क मिळावेत म्हणून ती वालीवधानंतर सुग्रीवाशी विवाह करते. सुग्रीव सीतेला शोधण्यात मदत करण्यात कुचराई करतोय हे जाणवल्यामुळे संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात त्याच्या अन्त:पुरात पोचतो. त्यावेळी तारा त्याची चांगलीच कानउघडणी करते आणि सुग्रीवाचे कवच बनून लक्ष्मणाच्या क्रोधापासून त्याचे रक्षण करते. आपले नाव तारा- रक्षण करणारी- असे सार्थ करते.

मंदोदरी

रामायणात मंदोदरीचे अत्यल्प वर्णन आहे. मंदोदरीने रावणाला दुष्कृत्ये न करण्याचा वारंवार सल्ला दिला. ती केवळ रावणाची सावली नव्हती तर अत्यंत रूपवती, राजनीतिज्ञ, विचारी स्त्री होती. तिने रावणाला सीतेला रामाकडे परत पाठवण्याबद्दल अनेकवार विनविले पण रावणाने तिला जुमानले नाही. पण मंदोदरीच्या धाकामुळे त्याने सीतेशी कधी गैरवर्तन केले नाही.

या पाचही स्त्री व्यक्तिरेखा स्त्रीत्वाच्या वेगळ्या अनुभूती व्यक्त करतात. या ोकाचे विेषण करता एक लक्षात येते की या पाचही जणी त्यांच्या मातृत्वासाठी किंवा पत्नीत्वासाठी ओळखल्या जात नाहीत तर त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता असलेल्या स्त्रिया म्हणून ओळखल्या जातात. आपण पंचकं ना असा पाठभेद घेतला तर या ोकाला आणि या पाच जणींना एक वेगळीच उंची प्राप्त होते.या पाच जणी भारतीय स्त्रीचे रूप आहेत. स्त्रीला योग्य सन्मान मिळाला पाहिजे. तिचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमता फुलू दिली पाहिजे. ती पुरुषाच्या बरोबरीने घराचा, समाजाचा, राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. आज समाजात भारतीय स्त्रीत्वाचा -स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली, बुद्धिमता असलेली आणि घरदार (कुटुंब आणि समाज) याची सर्मथपणे धुरा वाहणारी स्त्री- हाच आदर्श असला पाहिजे हा संदेश हा ोक देत असतो. कुठल्याही पातकाचा नाश करण्याचे सार्मथ्य याोकात पर्यायाने या स्त्रीयांमध्ये आहे ही पूर्वापार चालत आलेली र्शध्दा आहे. जी आजही घरोघरी या ोकाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.


No comments:

Post a Comment