Monday 29 March 2021

अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढली


किरकोळ गुन्ह्यांपासून अनेक गंभीर  गुन्हे अल्पवयीन मुलांच्या हातून घडत  असून दरवर्षी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची  संख्या खूपच चिंताजनक आहे. नुकताच  गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी)  प्रसिद्ध झालेल्या गुन्ह्यांच्या अहवालातून  सन २०१९ या वर्षात मुंबईमध्ये  सर्वाधिक ५४५ गुन्हे अल्पवयीन मुलांवर  दाखल झाले आहेत. मुंबईनंतर ठाणे  पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये  दाखल गुन्ह्यांची संख्या ३५६ असून  नागपूर आयुक्तालयातील आकडा  तितकाच आहे. तर, ठाणे ग्रामीणमध्ये  ८६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. ग्रामीण  भागापेक्षा शहरी भागात गुन्हेगारी अधिक  असल्याचे दिसून येते.

राज्यात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांपैकी अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण खूपच अल्प आहे. सन २००९मध्ये हे प्रमाण २.३२ टक्के होते. तर, २०१९ मधील प्रमाण १.३९ टक्के आहे. तरीही ही खूपच गंभीर बाब असून लहान वयातच मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे यावरून स्पष्ट होते. अनेकदा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुले सहभागी असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलास गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. हा मुलगा उत्तर प्रदेशमधील घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. तर, जानेवारीमध्ये ठाणे शहरात दोधा अल्पवयीन मुलांनी लोकांवर चाकूने हल्ला करत लूटमार केली होती. या हल्ल्यात काहीजण जखमीदेखील झाले. खुनासारखा गंभीर गुन्हाही अल्पवयीन मुलांविरुद्ध दाखल होत असून मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठवले जाते. परंतु बालसुधारगृहात राहून आल्यानंतरही पुन्हा ही मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येते. राज्यात अल्पवयीन मुलांविरुद्ध दरवर्षी हजारो गुन्हे दाखल होत असून काही दिवसांपूर्वी सीआयडीचा सन २०१९ या वर्षाचा गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात त्या वर्षी अल्पवयीन बालकांविरुद्ध ४ हजार ७४२ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यासह किरकोळ गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्वांत जास्त अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील गुन्ह्यांची संख्या ५४५ आहे. त्यानंतर ठाणे आणि नागपूर पोलिस आयुक्तालयाचा नंबर लागतो. या दोन्ही शहरांतील गुन्ह्यांची संख्या ३५६ असून सरासरी महिन्याला ३० गुन्हे दाखल होत असल्याचे दिसून येते. या गुन्ह्यामध्ये हत्या ९, हत्येचा प्रयत्न १२, दुखापत ८७, साधी दुखापत ६१ आदी विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील गुन्ह्यांची संख्या ७१ आहे. तर, ठाणे परिक्षेत्रामधील एकूण अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांची संख्या २२८ इतकी आहे. यामध्ये पालघरमध्ये ८८, ठाणे ग्रामीण ८६, रत्नागिरी २८, रायगड १५, सिंधुदुर्गमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.


No comments:

Post a Comment