Thursday 11 March 2021

ईश्वरदत्त आवाजाची देणगी लाभलेले किशोर कुमार


किशोर कुमार यांच्या कारकिर्दीतील हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलं गाणं म्हणजे ,आठ दिन' मधील ,' बांका सिपहिया, बांका सिपहिया..'. हे गाणं. त्यांना सचिनदा यांनीच उद्युक्त केलं होतं. वास्तविक, त्यांना पूर्ण गाणं देण्यात आलं नव्हतं.  त्यातील तीन चार ओळी गाण्यास सांगितलं होतं. किशोर कुमार यांनी त्यांच्यासाठी सर्वप्रथम पूर्ण गाणं गाणं गायलं ते 'बहार' चित्रपटासाठी. त्यातले बोल होते-' कसूर आप का, हुजूर आप का, मेरा नाम लिजीए, ना मेरे बाप का...' हे गाणं मुंबईत नाही तर मद्रासमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आलं होतं. तेव्हा किशोर कुमार सचिनदेव बर्मन यांच्या एका छोट्या खोलीत राहत होते. सचिनदा नेहमी किशोर कुमार यांना म्हणायचे- 'एय किशोर, हे गाणं गा, अशा पध्दतीने गा, भाव ओतून गा. गाण्याला सजवण्याचा फार प्रयत्न करू नकोस.त्यामुळे फार फरक पडत नाही. अगदी सरळपणे गा आणि पहा. लोकांना ते अधिक आनंददायी वाटेल. समजलं का?'

किशोरच्या आवाजाच्या गुणवत्तेमुळे सचिनदा खूपच प्रभावित झाले होते. त्यामुळेच, 'आठ दीना' च्या निर्मात्याचा विरोध असूनही त्याचा गायक म्हणून घेण्याचा त्यांचा त्यांनी सोडला नव्हता. किशोर गायक म्हणून तेव्हा फारसे परिचित नव्हते. पण सचिनदा मनापासून वाटत होतं की, त्याच्या गाण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि म्हणून ते त्यांना सतत संधी देत. 'आठ दिन' नंतर जाणीवपूर्वक'बहार' चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पार्श्वगायक म्हणून घेतलं. त्यांनी अगदी मनापासून या संधीचा पूर्ण उपयोग करून घेतला. किशोर कुमार यांच्यासाठी सैगल म्हणजे आदर्श गायक होते. त्यामुळे सुरुवातीला ते  त्यांची नक्कल करू पाहायचे. सचिनदांनी त्यांना सांगितलं- ' तू तुझ्या आवाजात गा. सर्वप्रथम नक्कल करणं थांबव. त्यांना ते पटलं आणि मग ते मुक्त कंठाने गाऊ लागले. परंतु तरीही जेव्हा एखादं दुःखी वा गंभीर , अर्थपूर्ण असं गाणं म्हणायची वेळ यायची ,तेव्हा ते शैलीत गायचे. कुमान त्यांचा प्रभाव तर अशा गाण्यांमध्ये स्पष्टपणे दिसून यायचा.

'सरगमेद निखद' या आपल्या आत्मवृत्तात सचिनदेव बर्मन यांनी म्हटलं आहे की- किशोर कुमार म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांचा सर्वात धाकटा भाऊ. एक गायक म्हणून त्याचादेखील मला शोध लागला. आणि मी त्याला हिंदी चित्रपटात गाण्याची संधी दिली. तेव्हा मी 'फिल्मीस्तान स्टुडिओ'त कामाला होतो. दादामुनी अर्थात अशोक कुमार यांनी स्वतःच निर्मिलेल्या 'आठ दिन' (1946) या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. आणि त्यासाठी मी काम करत होतो. मॅट्रिक परीक्षा दिल्यावर तो फिल्म स्टुडिओत येत असे. दादामुनी यांनी मला एकदा त्याच गाणं ऐकण्याची विनंती केली. किशोरने गायनासाठी कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं आणि तो कधी फारसा रियाजही करत नसे. परंतु त्याला आवाजाची ईश्वरदत्त आवाजाची देणगी लाभली होती आणि त्या आवाजाने मला मोहित करून टाकलं होतं. 'आठ दिन' चित्रपटासाठी मी त्याला गायला सांगितलं आणि त्याचा पहिलाच 'टेक ' बिलकूल'ओके' ठरला. मग मी दादामुनींना सांगितलं की, किशोरने महाविद्यालयात जाऊन शिक्षण सुरू ठेवण्याची काहीच गरज नाही. त्याऐवजी त्याने संगीत क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवावी, नंतर अल्पावधीतच  किशोरने हिंदी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक म्हणून आपलं स्थान निर्माण केलं.'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment