Thursday 25 March 2021

उन्हाळ्यातले माठ!


आपल्याकडे उन्हाळा हा कोणतीही चाहूल वगैरे न लागू देता दाणकन समोर येऊन सुरू होणारा ऋतू आहे. म्हणजे असं बघा की वळवाचा पाऊस पडून गेला की पावसाळ्याची चाहूल लागते. ऑक्टोबर हीट येऊनही संध्याकाळचं जरा गार वाटायला लागतं, तेव्हा हिवाळ्याची चाहूल लागते. हे दोन्ही तब्येतीत आपल्या आगमनाची वार्ता आधी देऊन मग निवांतपणे डुलत डुलत येणारे ऋतू. उन्हाळा असली काही कौतुक करत बसत नाही. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये अचानक एखाद्यादिवशी बाहेर भगभगित ऊन दिसतं, दिवसाचा तापमानाचा पारा ३५ डिग्रीला जाऊन पोचलेला असतो आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होते. मग गेल्या वर्षांचा माठ माळ्यावरून शोधून काढून तो स्वच्छ धुवून उन्हात वाळत ठेवणे, स्वेटर्स वगैरे कपाटात आत टाकून देऊन टोप्या, शॉर्ट्स बाहेर काढून ठेवणे इत्यादी उन्हाळ्याच्या तयारीची कामं आपण करून टाकतो. शहरी उच्चमध्यमवर्गीय असू तर एसीच्या रिमोटच्या बॅटरीज चालू आहेत का वधणे आणि बदलणे हे एक आणखी काम. शहरी मध्यमवर्गीय माणसाची उन्हाळ्याची तयारी इथेच संपते आणि मग तमाम जनता हाशहुश करत 'यंदा फारच कडक उन्हाळा आहे बुवा' अशी कुरकूर पुढचे तीनेक महिने करायला तयार होते! रणरणत्या उन्हात प्रवास करावा लागत नाही किंवा उन्हातच थांबून काम करावं लागत नाही अशा शहरी माणसांनी उन्हाळ्याबद्दल तक्रार करायचं काहीच कारण नसतं खरंतर. दिवसातला बहुसंख्य वेळ हा घरी पंख्याखाली किंवा ऑफिसात एसीमध्ये घालवणाऱ्या आणि जो प्रवास करावा लागतो तोही एसी असलेल्या चारचाकीतून करणाऱ्यांनी खरोखर तक्रार करूही नये उन्हाळ्याविषयी. पण अनेक लोकांना उगाचच तक्रारी अन् कुरकूर करत जगायची सवय असते. उन्हाळा म्हणजे 'बेक्कार उकाडा', पावसाळा म्हणजे 'नुसती चिकचिक', हिवाळा म्हणजे 'हुडहुड नुसती' अशी प्रत्येक ऋतूबद्दल तक्रार आणि कुरकूर करतच ते त्यांचं स्वागत करतात! मला तर सॉलिड आवडतो उन्हाळा! द्राक्ष, कलिंगडापासून ते स्ट्रॉबेरी, आंब्यांपर्यंत भरपूर फळं भरपूर प्रमाणात मिळण्याचा काळ असतो हा. शिवाय लस्सी, ताक, मिल्कशेक्स, आईसक्रीम्सची, सरबतं इत्यादींची रेलचेल असू शकते. ह्या सगळ्याची मजा घ्यायला खूप श्रीमंतही असावं लागत नाही. थंडगार नौरा, उसाचा रस, लिंबू सरबत वगैरे या काळात 'अमृत' वाटणाऱ्या पेयांचे पेले अगदी दहा-वीस रुपयांतही मिळतात! शिवाय, या काळामध्ये बोगनवेल, बहावा, पळस इत्यादी झाडांना येणारा बहर केवळ 'आहाहा' असतो! रणरणत्या उन्हात दिमाखात उभं असलेलं पूर्ण बहरलेलं एखादं बहाव्याचं झाड बघणं हा शब्दातीत अनुभव असतो. अशा ह्या रस, रंग आणि गंधानं बहरलेल्या ऋतूबद्दल तक्रार करणाऱ्या लोकांनाच खरंतर 'माठ' म्हणलं पाहिजे! पण ते असो!


No comments:

Post a Comment