Thursday 4 March 2021

सुभाषितं


अनेक शतकांपूर्वी संस्कृत भाषेत रचली गेलेली सुभाषितं ही आजही  तेवढीच उपयुक्त ठरतात. थोडक्यात बरंच कही सांगण्याचा हा प्राचीन वाङमय  प्रकार म्हणजे प्रभावी संवादकौशल्याची  प्रतीकंच आहेत. युक्तीच्या चार गोष्टी बेमालूमपणे सांगणारे कित्येक  श्लोक त्या-त्या पंडितांनी लिहिले.  मात्र यांतील संदेश फक्त विद्वानांपुरता  मर्यादित नाही. असंख्य सुभाषितं ही  सर्वसामान्यांना व्यावहारिक शहाणपणाचं  मार्गदर्शन करणारी आहेत.  कथा, कादंबरी किंवा नाटकांसारखी सुभाषितं मोठी नसतात. मात्र, त्या दोन ओळींमध्ये केवढा तरी अर्थ सामावलेला असतो. कथा, कादंबरीसारखा  मोठा आवाका असलेला आशय छोटेखानी काव्यातून नाट्यमय शैलीत खुलवलेला  असतो. काव्यात गुंफण केल्यामुळे  कोणतंही सुभाषित वारंवार म्हणण्यात लय असते. लक्षात राहायला मदत होते.  असा कितीतरी व्यापक विचार या रचना  प्रकारामागे आहे. त्या दोन ओळी कळल्या, त्यांतील अर्थ मनाला भिडला की, विषय संपला. इतर साहित्य प्रकारांसारखं मागचेपुढचे संदर्भ लक्षात ठेवायला नको. एकच एक सुभाषित स्वयंपूर्ण असतं.

पाठ्यक्रमातील विषयांपासून ते घरगुती, साध्या जगण्यापर्यंत मोलाचे मूलमंत्र सुभाषितं देऊन जातात. 'सु' म्हणजे चांगलं आणि 'भाषित' म्हणजे बोललेलं. वरवर पाहता एवढाच अर्थ दिसला तरी एक-एक सुभाषित हे व्यापक आशयाला गवसणी घालणारं असतं. त्यात एखादा मुद्दा, मत किंवा सिद्धांत जोरकसपणे सांगितलेल आढळेल. यांचं वर्गीकरण तरी किती प्रकारे करावं? शरीराचे अवयव, प्रवास, नवरस, सद्गुण- दुर्गुण, जन्म- मृत्यू, भक्ती-मुक्ती, आसक्ती वगैरे म्हणाल त्या विषयांसंबंधी सुभाषितं आहेत. काही गोड शब्दांत तर काही तिखट व तिरकस शैलीत एखादं जीवनसूत्र सांगून जातात. सरस्वती, विद्या आदींसंबंधी भरपूर सुभाषितं आहेत. स्त्रियांमधील चातुर्याची वाखाणणी करणारी कित्येक सुभाषितं सापडतात. उदाहरणार्थ,

'विद्या ददाति विनयं विनयायाति पारताम्। पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम्।।

सुभाषितांमध्ये गंमत, अर्थवैचित्र्य यांबरोबरच परंपरेतून चालत आलेलं शहाणपण साररूपानं सांगितलेलं असतं. निरनिराळ्या स्थल, काल, व्यक्ती, परिस्थितीनुसार कसं वागावं, यासाठी ललितरम्य भाषेत दिलेल्या या सूचना, निश्चितच आजही लक्षात घेण्याजोग्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment