Sunday 7 March 2021

पर्यावरण आणि महिला


तिने मनात आणले तर सारेच शक्य आहे ; तिच्याशिवाय हे जगही अशक्य आहे .. हे सर्वर्शुत आणि सर्वमान्य आहे. पर्यावरण संवर्धनात स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे, फार मोठे योगदान आहे. तिच्याबद्दल सांगायचे झाल्यास

तिच जननी तिच माती

तिच रुजविते असंख्य नाती

यावरून कदाचित माती आणि बाई यांचे अनेक गुणधर्म सारखेच,असे म्हणावे लागेल. सृष्टीचे जतन, संवर्धन करण्यासाठी ती प्रयत्नशील झाल्यास व तिला प्रोत्साहन मिळाल्यास ती निसर्गमित्र होऊन पर्यावरणाशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू शकते, पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करू शकते. कुटुंब ते अवकाश या व्यापक क्षेत्रात तिचे वाढते महत्त्व व वावर लक्षात घेता पर्यावरणाशी निगडित अनेक समस्यांचे निदान ती उत्कृष्टपणे करू शकते.

पर्यावरणाचे असंतुलन व वाढते प्रदूषण हे पर्यावरणाशी निगडित दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्लास्टिक बंदीची गरज, धूर- धुळीचे वाढते प्रमाण, वाढते तापमान, सागरी पाण्याची पातळी वाढणे, कचर्‍याचे ढिगारे तसेच अयोग्य व्यवस्थापन, पाण्याचे वाटप व वापराचे अयोग्य नियोजन, शहरीकरण, जगण्याच्या बदलत्या संकल्पना, स्वार्थ- हव्यास इत्यादंीमुळे पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते आहे. पर्यावरणाचा असमतोल व बदलांमुळे प्रदूषणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत.

वर्तमानकाळात पर्यावरण व त्याचे संवर्धन हा संवेदनशील मनांसाठी अत्यंत कळीचा तसेच जिव्हाळ्याचा पण व्यथित करणारा विषय आहे. निसर्ग अबाधित असेल तरच सजीव सृष्टी अस्तित्वात राहील याचे दाखल्यांसह उद्बोधन व प्रात्यक्षिकांसह कार्य गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन एक महिला या नात्याने पर्यावरण संवर्धनात आपणही खारीचा वाटा उचलू शकतो हे मनात आले आणि इच्छेचे रूपांतर संकल्पात झाले. विद्यार्थी दशेपासूनच रस्त्यांवर ,भिंतींवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे, बस, रेल्वेत शेंगांची टरफले, बिस्किट- चॉकलेटचे कव्हर फेकणे, घरातील केर रस्त्याच्या कडेला फेकणे, केळी ची साले इतरत्र फेकणे, मुक्या प्राण्यांचा छळ ,त्यांना बेदम मारणे, कचरा जाळणे, झाडांची कत्तल करणे यासारख्या घटनांनी मन नेहमीच व्यथित व्हायचे..चरफडायचे. अनेकदा अनेकांशी वाद व्हायचे. पण, वाद घालून काहीच उपयोग होत नाही हे लक्षात आले. बालमनावरील सकारात्मक संस्कार आणि तरुणाईला अनुकरणातून योग्य वळण लावले तर पर्यावरणाचे संवर्धन अधिक चांगले करता येईल याची जाणीव हळूहळू झाली. वैचारिक परिवर्तन पर्यावरण संवर्धनासाठी गरजेचे आहे हे प्रकर्षाने विचारात घेतले पाहिजे.

मुलींना पर्यावरणाच्या सुरक्षेची गरज व महत्त्व याची जाणीव करून दिली तर बर्‍याच प्रमाणात वागणूक आणि विचारात बदल करता येईल असे मनात आले, त्यासाठी मी लेखणीचा आधार घेतला. पर्यावरणीय समस्यांशी निगडित अनेक लेख कागदांवर उतरु लागले. वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके, दिवाळी अंक यातून पर्यावरणीय जागृती करणारे लेख प्रकाशित होऊ लागले, त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, फोन येऊ लागले. आपण पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा का होईना वाटा उचलल्याचे समाधान मलाही होऊ लागले. इतरांमध्ये जागरूकता व परिवर्तन होत असल्याचा आनंद होऊ लागला ,तो कायम टिकविण्याचे प्रयत्न सुरू झाले. सातत्याने पर्यावरणावर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बी ए च्या अभ्यासक्रमावरील पर्यारणशास्त्रहे पुस्तक लिहिण्याची ऑफर आली,ती मी लगेच स्वीकारली आणि तयारीला लागली. बघता- बघता जून २0२0 साली पुस्तक प्रकाशीत झाले. लोकसंख्या व पर्यावरण,कचर्‍याचे व्यवस्थापन व विल्हेवाट, पर्यावरण चैन आणि धोके, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदुषण, हरीत हाका, सागरपक्षी वाचवा, कृत्रिम वणवे, ग्रीन हाऊस इफेक्ट, दुष्काळाचे व्यवस्थापन, जैवविविधता यासारखे अनेक लेख लिहिले आणि कृतीतदेखील आणले.

पर्यावरणाविषयी जेवढी जागरूकता करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना हाताशी घेऊन नगरपंचायती अंतर्गत लावलेल्या झाडांना पाणी घालणे, कचरा गोळा करणे, परिसर स्वच्छ करणे, वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे ही कामे केली. एक पाऊल पर्यावरणासाठी हा उपक्रम सुरू झाला.

वरील कार्यातून एक अनुभव विशेषत्वाने जाणवला तो म्हणजे मुली पर्यावरणाशी निगडित सर्व कामे मनापासून करतात. वेळोवेळी हे करा ,हे करू नका असे संदेश घोषवाक्य, निबंध, कविता यातून दिले जाऊ लागले. मूक प्राण्यांना आर्शय मिळाला,पाखरांना दाणे पाणी ची सोय झाली. प्रत्येक घरापुढे छोटी २ मडकी टांगलेली दिसू लागली. थोडक्यात निसर्गाला होणारी इजा कमी झाली. परिसर स्वच्छ सुंदर झाला.

महिलांनी मनात आणलं तर कळत नकळत त्या पर्यावरण संवर्धन करू शकतात ते याप्रमाणे- हे करावेच -

रोजच्या घरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे.

ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करून ते बागेत, कुंड्यात वापरावे.

कचरा गाडीवाल्याला नियमितपणे कचरा द्यावा,तो इतरत्र टाकू नये.

घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.

टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याची कला अवगत करावी. ती इतरांना शिकवावी.

प्लास्टिकऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा.

कुटुंब तसेच बालमनांवर, विद्यार्थी, सहकारी, कर्मचारी व संपर्कात येणार्‍या लोकांवर संस्कार करावेत.स्वच्छता अभियानात महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आज शेतीपासून अवकाशापयर्ंत महिलांचा वावर असल्यामुळे त्या सहज सुलभ व स्वाभाविकपणे पर्यावरणाचे संवर्धन करतात. पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न प्रदूषणाच्या तुलनेत कमी पडत आहेत त्यामुळे सामूहिक प्रयत्नांनी त्यावर उपाय योजणे ही मोठी गरज व जबाबदारी आहे.

प्रत्येकीने आपल्या आयुष्यात काही झाडांचे जतन, आवश्यक स्वच्छता, सार्वजनिक स्थळांचा नेटका वापर, सकारात्मक वागणूक, निसर्गाचा सन्मान, नियम व पर्यावरणीय कायद्यांचे पालन केल्यास,त्याचा प्रसार व प्रचार केल्यास, घरात संस्कार केल्यास ..पर्यावरण संर्वधनासाठी वेगळे, विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. पर्यावरण संवर्धन जगण्याची एक सहज सवय बनून जाईल आणि आपल्या सगळ्यांना मोकळा श्‍वास घेता येईल.

No comments:

Post a Comment