Sunday 7 March 2021

अमृता शेरगिल


विसाव्या शतकातील प्रभावी प्रतिभासंपन्न महिला चित्रकार म्हणून अमृता शेरगिल यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आयुष्याची लांबी मोजण्यापेक्षा त्या आयुष्यात काय साध्य केले याची नोंद घ्यावी हे वाक्य अमृता शेरगिल यांच्या बाबतीत अगदी खरे ठरते. अतिशय छोटेसे आयुष्यमान घेऊन जन्माला आलेली ही मनस्वी कलाकार काळावर आपल्या प्रतिभेची अमीट छाप सोडून गेली.

अमृता शेरगिल यांचा जन्म हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सन ३0 जानेवारी १९१३ ला झाला. संस्कृत-फारसी या भाषांचे गाढे तज्ज्ञ व विद्वान असणार्‍या त्यांच्या पित्याचे नाव उमरावसिंह शेरगिल मजीठिया होते. त्यांची आई अँटोनी गोटसमन ही हंगेरी येथील यहुदी ऑपेरा गायिका होती. इंदिरा शेरगिल ऊर्फ सुंदरम ही त्यांची धाकटी बहीण. अमृता यांचे बालपण बुडापेस्ट येथेच गेले. बालवयापासूनच कला, संगीत, अभिनय यांची उत्तम जाण असणार्‍या अमृता यांना अधिक पैलू पाडण्याचे काम त्यांचे मामा एर्विन बकते यांनी केले. चित्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी घरातील नोकर-चाकर, आसपासच्या वातावरणातील अनेक घटकांचा चित्रात अंर्तभाव करण्यासाठी अमृताला प्रोत्साहित केले.

सन १९२१ मध्ये शेरगिल कुटुंबीय भारतातील सिमला या भागात वास्तव्यास आले. तेथे पियानो, व्हायोलिन वादन शिकता शिकताच अमृता यांनी गॅएटी थिएटरमध्ये नाटकात अभिनय करणे सुरू केले. त्याच दरम्यान इटली या देशातील अनेक मूर्तीकारांशी तिच्या कुटुंबीयांचा परिचय झाला व अमृताला इटलीच्या कलाजगताची माहिती मिळाली. पुढे सोळाव्या वर्षी चित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला अमृता आईसोबत पॅरिसला गेली. तिथे तिने प्रसिद्ध चित्रकार पिअरे व्हॅलेंट, लुसीए सायमन आणि राज संस्थानातील मान्यवर चित्रकारांकडून चित्रकलेचे धडे घेतले. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रांवर चित्रकार शिक्षक व्हॅलेंट व प्रिय मित्र बोरिस तेजलिस्कीमुळे युरोपियन शैलीचा प्रभाव होता. सन १९३२ ला त्यांनी काढलेल्या यंग गर्ल या चित्रांमुळे त्यांना सन १९३३ चा ग्रँड असोसिएट हा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान प्राप्त करणार्‍या त्या सर्वात कमी वयाच्या पहिल्या आशियायीन कलाकार होत्या. सन १९३४ मध्ये त्यांना तीव्रपणे भारतात परतण्याची ओढ लागली. भारतात परतल्यावर त्यांनी पारंपरिक कलेच्या अभ्यास व संशोधनार्थ स्वत:ला वाहून घेतले. मृत्यू येईपयर्ंत त्यांचे हे कार्य अखंड सुरू होते. सन १९३६ मध्ये काही काळ सिमला येथील स्वत:च्या घरी वास्तव्य करून त्यांनी कला शोधार्थ भ्रमंती सुरू केली. कार्ल खंडालावाला यांची त्यांना या कामी मदत झाली. मुगल व पहाडी शैली त्यांच्या मनाचा ठाव घेऊ लागली. अजिंठा येथील चित्र-शिल्पकलेने त्या भारावल्या.

सन १९३७ या वर्षी त्यांच्या चित्रकारितेत कमालीचे परिवर्तन आले. त्यादरम्यान निर्माण केलेल्या चित्रात त्यांनी युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव झुगारून अत्यंत सहजपणे सढळ हस्ते भारतीय रेखाटने व रंगांचा वापर केला. त्यावेळी त्या दक्षिण भारतात भ्रमण करीत होत्या. ब्राइड्स टॉयलेट, ब्रम्हाचारीज, साऊथ इंडियन व्हिलेर्जस गोइंग टू मार्केट या त्यावेळच्या त्यांच्या चित्रातून प्रामुख्याने भारतातील जनजीवनाविषयी सहानुभूती व संवेदना झळकतात. हा त्यांच्या जीवनातील संस्मरणीय संक्रमणाचा काळ होता. परदेशी कलासंस्कार व शैलीचे विस्मरण घडवून त्यांचे अंतरंग व त्यानुरूप तयार होणारी कलाकृती संपूर्ण भारतीय अभिव्यक्तीत साकारत होती.

१९३८ मध्ये डॉ. व्हिक्टर एगन यांच्याशी विवाह केल्यानंतर अमृता गोरखपूर येथे रहावयास गेल्या. अमृता शेरगिल यांच्या नावाचीही समकालीन चित्रकारांमध्ये गणना व्हायला लागली. व्हिलेज सीन, इन द लेडीज एंक्लोसर आणि सीएस्टा या त्यांच्या चित्रातून ग्रामीण जगणे, त्यातील बारकावे व महिलांच्या आयुष्यातील खोल धागेदोरे सापडतात. महात्मा गांधी यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांच्याही मनात गरीब, व्यथित व वंचित जनतेविषयी कळकळ निर्माण झाली. हृदयातील हे भाव त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत. त्यांच्या या सहिष्णुतेमुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९४0 मधील गोरखपूर दौर्‍यात त्यांची आठवणीने भेट घेतली. सप्टेंबर १९४१ मध्ये अमृता पतीसमवेत लाहोर येथे गेल्या असताना गंभीर आजारी पडून कोमात गेल्या व दुर्दैवाने त्यांचा ६ डिसेंबर १९४१ ला लाहोर येथेच मृत्यु झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उलगडले नाही पण काही जाणकारांच्या मते असफल गर्भपाताचा प्रयत्न हे एक कारण सांगितल्या जाते. लहानसे आयुष्य जगून ही महान कलाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेली.

अमृताच्या मृत्यूनंतरही त्यांची चित्रे लोकप्रिय होत गेलीत. कालांतराने अमृता शेरगिल यांना भारतातील सर्वात महागडी महिला चित्रकार मानल्या गेले. भारतीय पुरातात्त्विक सर्वेक्षण विभागाने सन १९७६-१९७९ मध्ये केलेल्या यादीत अमृता शेरगिल यांचा नऊ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये समावेश केला. प्रसिद्ध मेक्सिकन पेंटर फ्रिडा काहलो यांच्याशी अमृता यांची तुलना होऊ लागली. फ्रिडा यांच्या चित्रात असणारा मुक्त क्रांतिकारी भाव, देशीय जनजीवन आणि सेल्फ पोट्र्रेट निर्मिती अमृता यांच्याही चित्रात ठासून भरलेली होती. बुडापेस्ट येथे त्यांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात आले. जगभरातील अनेक कलाकारांसाठी त्या प्रेरणास्थान झाल्यात. १९९३ मध्ये आलेल्या तुम्हारी अमृता या नाटकाच्याही त्या प्रेरणास्थान होत. युनेस्कोने सन २0१३ ला अमृता शेरगिल आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित करून त्यांच्या शंभराव्या जयंतीचा जागतिक स्तरावर सन्मान केला.

त्यांच्या कार्याला भारतीय संस्कृतीसाठी अत्यंत मोलाचे मानत त्यांच्या चित्रांना भारतातच ठेवण्याचा मुख्य निर्णय भारत सरकारने घेतला.अवघे अठ्ठावीस वर्ष वयोमान लाभलेली ही असामान्य कलाकार शलाकेसारखी चमकून अल्प क्षणात विलीन झाली असली तरी चित्ररूपाने आजही अजरामर आहे.

No comments:

Post a Comment