Saturday 6 March 2021

एम्प्रेस गार्डन


एम्प्रेस गार्डन हे पुण्यातील वैभव आहे. पेशवाईच्या काळापासून नैसर्गिक संपत्तीचा डौल मिरवतअसलेल्या गार्डनला पूर्वी सोल्जर्स गार्डन म्हटले जाई. याला एक स्वतःचा इतिहास आहे. सरदार महादजी शिंदे यांची वानवडीला छत्री आहे. त्यांचे सैन्य याच जागेवर असायचे पेशवाईचा पाडाव झाल्यावर ब्रिटिश सैन्य याठिकाणी थांबू लागले. अग्री सोसायटी हॉर्टीकल्चरल ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे 1830 साली या उद्यानाची जबाबदारी होती. या संस्थेकडे खडकीचे उद्यान आणि मुंबईची राणीची बागही देखभालीसाठी देण्यात आली होती. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्मन यांनी या बागा दिल्या होत्या. संस्थेसाठी त्याकाळी डॉ. भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेठ, डेव्हिड ससून, रावसाहेब मंडलिक जमशेटजी जिजीभाई ही मंडळी काम करत होती. समाजसेवेची आवड आणि वनस्पती जोपासणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उद्यानाच्या विकासाला त्याकाळी सुरुवात झाली. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या उद्यानाची जागा तत्कालीन मुंबईच्या प्रांतात गेली. त्यानंतर जागेची मालकी राज्य सरकारकडे गेली. या ठिकाणी वृक्षराजींची एक परंपरा आणि वंश विकसित झाले आहेत. निबिड आरण्यांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि पक्षी पाहायला मिळतात. उद्यानात असलेल्या कांचनवेल तर तब्बल अकरा अर्धा एकरावर विस्तारलेल्या आहेत. किनई, धावडा, कळम, सीता अशोक, कुसुम्ब, बेगर्स बाऊल, चांदन वावळ, मुचकुंद, टेमरू, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, बेहडा, मास्ट ट्री, महोगनी, मोह, बांबूचे जायंट, बुद्दास वेली, मलेशियन ऍपल, बिबा, चक्राशिया, नांद्रुक, रुद्राक्ष, रक्त रोहिडा, समुद्रशोक, उर्वशी मेढशिंगी, गोरख चिंच, जांभूळ, आंबा इत्यादी वृक्ष येथे आहेत. ययेथे700 प्रजातींचे वृक्ष पाहायला मिळतात. दीड हजारांपेक्षा अधिक वृक्ष असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी हे उद्यान महत्त्वाचे आहे.  उद्यानात ब्ल्यू मोरमॉन नावाचे दुर्मीळ फुलपाखरू, मोर, ग्रे हॉर्नबिल, पॅराडाईज फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक) हे पक्षी पाहायला मिळतात.
ब्रिटिशांनी125 वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या अमेझॉन जंगलामधून अमेझॉन लिलीचे रोप भारतात आणले होते. एक रोप कोलकात्याच्या उद्यानात तर दुसरे एम्प्रेस गार्डनमध्ये लावण्यात आले होते. ही वनस्पती आजही जिवंत आहे. या वनस्पतीच्या एका पानात 30-35 किलोचा भार पेलण्याची क्षमता आहे. एम्प्रेस गार्डन हे 55 एकरांमध्ये वसले होते. 1970-80 च्या दशकात त्याचे दोन भाग झाले. आता 39 एकरांमध्ये ही भाग शिल्लक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment