Friday 5 March 2021

गंगूबाई हनगळ


गंगूबाई हनगळ या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. गंगूबाई हनगळ यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)कॉंग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.

गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली.

वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगळ, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.

इ.स. १९२५ मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वयरू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.इ.स. १९२८: मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्ताेपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.१९३१ मुंबईतील गोरेगांव येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.१९३२ हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.

भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २00 शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.

१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या गांधारी या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६0 ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. मिस गांधारी यांची रेकॉर्ड प्रचंड लोकप्रिय झाली.

No comments:

Post a Comment