Tuesday 2 March 2021

आधुनिक शहर: हैदराबाद


हैदराबाद हे शहर काही प्राचीन शहर नाही. या शहराचा इतिहास चारशे वर्षांच्या आसपासचा आहे. पंधराव्या शतकानंतर गोवळकोंडा किल्ल्यावरची वस्ती वाढू लागली. विकासासाठी जागा अपुरी पडू लागल्याने सत्ताधारी महंमद कुली कुतुबशहा याने किल्ल्यापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या यआ जागेची निवड केली. पूर्वी येथे 'चिंचलम' नावाचं एक खेडं होतं. इथे त्याची आवडती भागामती नावाची एक सुंदर हिंदू नर्तकी राहत होती. तिच्या आठवणी जागवण्यासाठी त्याने या राजधानीचे नामकरण 'भागानागर' केले.  भागामतीने पुढे मुस्लिम धर्म स्वीकारल्याने महंमद कुली बादशहाने शहराचे नाव हैदरमहल' ठेवले.पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन या राजधानीचे नाव 'हैद्राबाद' झाले.

आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबादची लोकसंख्या सत्तर लाखांच्यावर आहे. भाषा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम या नगरीत आहे. तेलगू, उर्दू, हिंदी, मराठी या भाषा इथे प्रचलित आहेत. देशातील पाचव्या क्रमांकाच्या या शहरात वावरताना परकेपणाची जाणीव होत नाही. पंडित नेहरू हे येथील अठरापगड जाती, धर्म, भाषा आणि समाजाच्या पूर्वापार सहजीवणामुळे या शहराचं वर्णन 'छोटा भारत' असं सार्थ वर्णन करत.  पुढच्या पाच दशकात इथे इसीआयएमसारख्या विज्ञान संस्था, पाच विद्यापीठं उभारली गेली.त्यामुळे हैदराबादचा उल्लेख 'सायन्स सिटी' असा होऊ लागला. अलिकडे माहिती तंत्रज्ञानात शहराने गाठलेल्या उतुंग उंचीमुळे 'सायबराबाद' म्हणूनही प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. कधीकाळी हैदराबादचा उल्लेख 'दख्खनचा नगिना' असा केला जाई. ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरेतून औद्योगिकी करणाच्या क्षेत्रात या शहराने मोठी भरारी घेतली आहे.
याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळांमुळे देश-परदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. 'चारमिनार' या शहराची जान आणि शान आहे.लाडबाजार, मक्का मशीद, चौमहल्ला, फलकनुमा पॅलेस, कुतुबशाही मकबरे, सालारजंग वस्तुसंग्रहालय, नेहरू झोऑलॉजिकल पार्क, वनस्थलीपुरम हरीण उद्यान, पब्लिक गार्डन, उस्मानिया विद्यापीठ, बिर्ला सायन्स सेंटर, निमानिया वेधशाळा, एनटीआर गार्डन्स,रामोजीराव फिल्म सिटी अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासारखी आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली 9423368970

No comments:

Post a Comment