Tuesday 9 March 2021

'दो आंखे बारह हाथ' या चित्रपटाचे मूळ प्रेरणास्रोत काय?

  


उत्तर- चित्रमहर्षी शांतारामबापूंच्या चित्रपटनिर्मितीमागे ज्वलंत सामाजिक प्रश्नांची व्यापक पार्श्वभूमी असे. ते अनेक  नावीन्यपूर्ण प्रयोग करीत असत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी  महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे सामाजिक परिवर्तन होऊ घातले  होते. महाराष्ट्रातील एक आद्य उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर  यांनी औंध संस्थानातील ओसाड माळरानावर 'किर्लोस्करवाडी  ही उद्योगनगरी उभारली. पुढे तिची जसजशी वाढ होऊ लागली  तसतशी वाडीच्या संरक्षणाची समस्या उद्भवली. औंधच्या अधिपतींकडून फक्त दोन पोलीस मिळतील, असे कळविल्यावर लक्ष्मणरावांनी एक वेगळाच प्रयोग करायचे ठरविले. त्यांनी औंधच्या तुरुंगामधील अट्टल दरोडेखोर जे कित्येक वर्षे खितपत  पडले होते ते पिऱ्या मांग, तुका रामोशी, बाळा रामोशी अशा  चार-पाच लोकांच्या सुटकेची मागणी करून किर्लोस्करवाडीच्या  संरक्षणार्थ नेमण्याची विनंती औंधच्या राजांना केली. शेवटी  राजेसाहेबांनी हा साहसी प्रयोग मान्य केला. सर्व दरोडेखोरांना  मुक्त करून किर्लोस्करवाडीला आणण्यात आले. तेथे एक मोठी जाहीर सभा घेऊन सर्वांपुढे हजर करण्यात आले. नंतर सर्वांनी 'मी यापुढे कुठलाही गुन्हा करणार नाही, दारू पिणार नाही व  कारखान्याचे कुठलेही काम इमानेइतबारे करेन' अशी शपथ  घेतली. मीठ तोंडात टाकून व बेलभंडारा उचलून बाजूस सरायचे असा गंभीरपूर्वक शपथविधी पार पाडल्यानंतर ते दरोडेखोर व  त्यांचे कुटुंबीय यांना कारखान्यामध्ये काम शिकवले, मुलांच्या  शिक्षणाची व्यवस्था केली. ते दरोडेखोर रात्री वाडीची राखणही  करीत. एक खुला तुरुंग राबविला जाऊ लागला. वाडी हे एक  आधुनिक सांस्कृतिक केंद्रही बनू लागले. तेथे विविध कार्यक्रम, नाटक ,सिनेमा होऊ लागले.तेथे आद्य चित्रपट प्रणेते दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर यांचे चित्रपट दाखवले जात असत. त्यावेळी त्यांना 'खुला तुरुंग' कसा असतो याची माहिती झाली. व तीच प्रेरणा घेऊन अतिशय कल्पकतेने त्यांनी ती कहाणी ''दो आंखे बारह हाथ' या चित्रपटात साकार केली. शंकरराव किर्लोस्कर यांच्या 'यांत्रिकांची यात्रा' या उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवनचरित्रामध्ये माहिती व इतिहास आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

No comments:

Post a Comment