Thursday 13 May 2021

हिमालयातील मानवासारखा दिसणारा यती


हिमालयामध्ये मानवासारखा दोन पायांवर चालणारा व धिप्पाड असा प्राणी असल्याचे म्हटले जाते. कुणी त्याला वानरासारखा प्राणी म्हणतात तर कुणी अस्वलासारखा. त्याला 'यती' हे नाव प्रसिद्ध आहे. नेपाळमधील दंतकथांमध्ये यतीचा उल्लेख त्रास देणारा हिमामानव असा आहे. हा एखाद्या मोठ्या अस्वलासारखा दिसतो. सामान्य पुरुषाच्या उंचीहून अधिक उंच असणारा हा प्राणी दोन पायांवर थोडा पोक काढून चालतो. स्वत:च्या संरक्षणासाठी यतीकडे दगडापासून बनवलेले मोठे हत्यार असते तसेच सळसळत्या पानांच्या आवाजासारखा त्याचा आवाज असतो. हा प्राणी हिमालयात, सैबेरियात आणि मध्य तसेच पूर्व आशियामध्ये अढळतो. यती पाहिल्याचे दावे अनेकांनी केलेले आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. 

मात्र, अनेक व्यक्तींच्या आत्मचरित्रांमध्ये त्याची नोंद आढळते. 'नगाधिराज' हिमालयात आजही अनेक रहस्ये दडलेली आहेत. जगातील सर्वात उंच दहा पर्वतशिखरे जिथे आहेत अशा हिमालयात जीवजंतूंपासून वनस्पतीपर्यंत अनेक अज्ञात प्रजाती आजही आहेत. एव्हरेस्टसारखे जगातील सर्वात उंच म्हणजेच 8850 मीटर उंचीचे शिखरही हिमालयातच आहे. ते पादाक्रांत करण्यासाठी जगभरातील गिर्यारोहक हिमालयात येत असतात. अनेक गिर्यारोहकांनी यतीच्या मोठ्या पाऊलखुणा पाहिल्याचे दावे केलेले आहेत. नेपाळ, तिबेट आणि भूतानच्या परिसरातून असे दावे अनेकवेळा झाले आहेत. एव्हरेस्ट शिखरावर पहिल्यांदा यशस्वी गिर्यारोहण सर एडमंड हिलरी आणि शेरपा तेनजिंग नोर्गे यांनी केले आहे.

तेनजिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात हिमालयातील या गूढ प्राण्याविषयीही लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या वडिलांनी यतीला अनेक वेळा पाहिले होते; पण त्यांनी स्वतः कधीही यती पाहिला नाही. मात्र, यतीच्या पावलांचे ठसे मात्र आपण पाहिलेले असल्याचे तेनजिंग यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. एरिक शिप्टन यांनीही यतीची पदचिन्हे पाहिल्याचे म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ही पदचिन्हे 13 इंचाची होती व त्या हिशेबाने हा यती सात फूट उंचीचा असावा. गिर्यारोहक रेनहोल्ड मेस्नर यांनीही म्हटले आहे की एकदा ते रस्त्यातून भरकटले आणि अशावेळी त्यांनी यतीला पाहिले. हा यती अतिशय भयावह दिसत होता. त्याची आकृती माणसासारखीच होती. आपण रात्रीही यतीला पाहिले; पण अंधार असल्यामुळे त्याला नीट पाहता आले नाही असे त्यांनी म्हटले आहे.

2017 साली संशोधकांच्या एका गटाने अनेक ठिकाणांहून यतीच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून जे काही सापडले ते सर्व पुरावे गोळा केले. मात्र संशोधनाच्या शेवटी ते अस्वलाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 2008 साली अमेरिकेमधील दोन जणांनी आम्हाला अर्ध मानव आणि अर्ध माकड असणाऱ्या प्राण्याचे अवशेष मिळाले असल्याचे सांगितले. मात्र तपासाअंती तो गोरीलासारखा दिसणारा पोशाख निघाला. त्यामुळे यती असण्याला अधिकृत पृष्ठी मिळाली नाही.

असे असले तरी या यतीबाबत जगभरात उत्सुकता आहे. या व्यक्तिरेखेवर अनेक टीव्ही मालिका, चित्रपट निघाले आहेत.जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून सिरीजपैकी एक असणाऱ्या ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ टीनटीन’मध्येही यतीसंदर्भातील भाग दाखवण्यात आला होता. परदेशात 'बीगफूट', 'यती: कर्स ऑफ द स्नो डेमोन', 'रेज ऑफ द यती', 'स्मॉलफूट', 'अॅबोमिनेबल', 'योको', 'स्नो बिस्ट', 'द स्नो क्रिचर', 'द मिस्टेरियस मॉनस्टर', 'हाफ ह्युमन', 'स्नो बिस्ट, मॅन बिस्ट', 'यती: द ट्वेटियथ सेंच्युरी जायंट' असे अनेक सिनेमे या विषयावर बनवण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment