Thursday 13 May 2021

देशातील पहिली प्रमाणित महिला 'चॉकलेट टेस्टर'


चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात आणि त्याचा लाभ हृदयासह अनेक अवयवांना होतो. चॉकलेटमुळे एंडोर्फिन हार्मोनचा स्तरही वाढतो. त्यामुळे मनावरील ताण हलका होऊन ते आनंदी बनते. याच गुणामुळे चॉकलेटला 'मूड बूस्टर'ही म्हटले जाते. मात्र, हे उपयोग आहेत म्हणून चॉकलेट खाणारे क्वचितच कुणी असेल. चॉकलेटच्या गोड चवीची भुरळ पडलेली असल्यानेच अनेक आबालवृद्ध चॉकलेटचे सेवन करीत असतात. त्यामुळे चॉकलेटची चव घेऊन त्याचा दर्जा ठरवणारे काम मिळाले तर अनेकांना ते स्वप्नवतच वाटू शकेल. पूनम चोरडिया यांना भारतातील पहिल्या महिला 'चॉकलेट टेस्टर' म्हणून अधिकृतरीत्या प्रमाणित करण्यात आलेले आहे. टी-टेस्टरप्रमाणेच चॉकलेट टेस्टर हा व्यवसायही अनेकांना आवडणाराच आहे. आपल्या देशात त्याची आता कुठे सुरुवात झालेली आहे. पूनम व त्यांचे पती नितीन चोरडिया हे चॉकलेट टेस्टर म्हणून काम करतात. दोघांनी गेल्यावर्षी देशातील पहिली 'झीरो फर्स्ट वेस्ट चॉकलेट कोकोआ ट्रॅट'ची सुरुवात केली. पूनम यांना या कामाची आवड नितीन यांच्या चॉकलेटप्रेमामुळेच निर्माण झाली. नितीन आधी रिटेल कन्सल्टंट 'चॉकलेट टेस्टर' म्हणून काम करीत होते. त्यांच्या कामाचा बहुतांश भाग चॉकलेटची चव घेणे आणि त्याचा दर्जा जाणून घेणे याचाच होता. ते 2007 मध्ये एका इटालियन चॉकलेट उत्पादक कंपनीचे चॉकलेट बार टेस्ट करण्याचे काम करीत होते. ते घरी येऊन पत्नीलाही वेगवेगळ्या चॉकलेटची माहिती देत असत. नितीन यांनी 2014 मध्ये परदेश दौऱ्यानंतर देशात अशा पद्धतीचे काम सुरू करण्याचे ठरवले. 2015 मध्ये नितीन आणि पूनम या दोघांनीही चॉकलेट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. पूनम यांनी सांगितले, 'आम्ही स्वतः चॉकलेट खरेदी करणे आणि एफएसएसएआयकडून लायसेन्स मिळाल्यानंतर ते बनवण्यास सुरुवात केली.' चेन्नईमध्ये पूनम आपल्या पतीसह 'चोकोशाला'चे आयोजनही करतात. त्यामध्ये लोकांना चॉकलेट बनवण्याच्या पद्धती, डार्क चॉकलेटस्, बोनबोंस ट्रफल्स आणि त्यांच्या फायद्यांबाबत सांगतात. चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया समजून घेत असतानाच पूनम यांनी 2018 मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेट अँड कोकोआ टेस्टिंग, इंग्लंडमधून चॉकलेट टेस्टिंगची पहिली व दुसरी लेव्हल पूर्ण केली. नितीन यांनी ही लेव्हल 2016 मध्ये पूर्ण केली होती.


No comments:

Post a Comment