Monday 17 May 2021

अमेरिकन अवकाशात दिसत होत्या 'उडत्या तबकड्या'


'उडत्या तबकड्यां'ची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे. या उडत्या तबकडया पाहिल्याचे अनेकजण दावा करत आहेत. मात्र त्या कोठून येतात, का येतात, याचा शोध लागत नाही. यासाठी अनेक प्रकारे संशोधन सुरू आहे. काही लोक या तबकड्या परग्रहवासीयांच्या असतात, असे म्हटले जात आहेत. काहीजण या उडत्या तबकड्या अनेक देशांच्या असल्याचे व ते देश आपल्या देशाची टेहळणी करत असल्याचे म्हणत आहेत. इतकेच काय, तर अमेरिकेत पहाडी इलाख्यात परग्रहवासीयांची वस्ती असल्याचेही म्हटले जात आहे, परंतु यातून ठोस असे काही समोर आलेले नाही. आता नुकतीच आणखी एक माहिती समोर आली आहे. सुमारे दोन वर्षे रोज अवकाशात आपण हजारो उडत्या तबकड्या उडताना पाहिल्या असल्याचा दावा, अमेरिकेचे माजी नौसैनिक पायलट लेफ्टनंट रेयॉन ग्रेव्ह यांनी केला आहे. या उडत्या तबकड्या पृथ्वीच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उडत्या तबकड्याबद्दल बोलताना ग्रेव्ह यांनी सांगितले की, २०१९ च्या सुरुवातीला व्हर्जिनिया किनारपट्टीवर रोजच्या रोज अज्ञात विमानसदृश उडत्या तबकड्या दिसून येत होत्या.

दरम्यान, अमेरिकन संरक्षणमंत्री आणि नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकांकडून उडत्या तबकड्याबाबत एक महिन्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत. तत्पूर्वी रेयॉन ग्रेव्ह यांनी उडत्या तबकड्या 'यूएफओ'बाबत दावा करून खळबळ उडवून दिली आहे. ग्रेव्ह यांनी सीबीएस चॅनेलशी बोलताना सांगितले की, मी या उडत्या तबकड्यांवरून चिंतीत आहे. जर ही विमाने दुसऱ्या देशांची असती तर मुद्दा वेगळा असता. मात्र, हा काही दुसराच प्रकार आहे. आम्ही मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असलो तरी ते प्रत्येकवेळी आपल्यावर नजर ठेवत आहेत. या विमानाचा वेग आणि उंची फार आहे. हा एक धोकादायक प्रकारच आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, २०१९ मध्ये त्रिकोणी आकाराच्या या यूएफओची छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. मात्र, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. असे झाल्यास यूएफओवरचा पडदा हटण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment