Wednesday 12 May 2021

प्राण्यांसाठी अनोखे पूल, बोगदे


रस्ते किंवा मोठ्या मार्गावर अथवा रेल्वे मार्गावर नदी, ओढे येत असतील तर त्यावर पूल बांधले जातात. डोंगर पोखरून बोगदा काढण्यात येतो. डोंगर, पर्वतावर जाण्यासाठी काही ठिकाणी 'रोप वे' चा वापर करण्यात येतो.  यामुळे दळणवळण सुलभ होते. वेळेची बचत होते. हे सर्व माणसाने माणसांसाठी केले आहे. मात्र माणसांनी पशु-पक्ष्यांसाठीही असे पूल,बोगदे बांधण्यात आले असल्याचे वाचले किंवा पाहिले आहे का? बसला ना आश्चर्याचा धक्का! पण हे खरे आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

टर्टल टनेल, जपान : आपण कासवं पाहिली आहेतच. पण या कासवांसाठी बोगदा (टनेल) बांधला असल्याचे कुणाला माहीत नसेल,पण जपानमध्ये समुद्र काठावर कोबे शहरात यांच्यासाठी खास  बोगदा काढण्यात आला आहे. समुद्र काठीच शहर असल्या कारणाने नेहमी कासवं समुद्राबाहेर येतात.कित्येकदा ही कासवं रेल्वे मार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात. यावेळी ते रेल्वे मार्गावर अडकून पडत किंवा मोठे अपघात घडत. कित्येकदा रेल्वे थांबवावी लागत असे.तेव्हा कासवांना सुरक्षित रेल्वे लाईन पार करण्यासाठी एक मार्ग काढण्यात आला. रेल्वे पट्टयांच्या खालून छोटे टनेल्स बनवण्यात आले. ते वरून मोकळे आहेत. इथून नेहमी कासव रेल्वेमार्ग पार करताना दिसतात.


 रोप ब्रिज, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातल्या उत्तर-पूर्व व्हिक्टोरियाच्या ह्युम हायवेवर उभारण्यात आलेल्या रोप ब्रिजची एक वेगळीच ओळख आहे. या भागात उडणाऱ्या खारुट्यांच्या प्रजाती राहतात. या खारुट्या अन्नासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. या हायवेवर रात्रंदिवस सुरू असलेल्या राहदारीमुळे अपघात होऊन मरणाऱ्या खारुट्यांची वाढली. त्यांना वाचवण्यासाठी हायवेच्या दुतर्फा आणि मध्ये उंचच्या उंच खांब उभे करण्यात आले आणि यावर पातळ दोरींचा रस्ता बनवण्यात आला. हा रोप ब्रिज बनवल्यानंतर आता उडणाऱ्या खारूट्या आरामात हायवे पार करतात. खारुट्यांबरोबरच छोटे प्राणीही या ब्रिजचा उपयोग करतात.


टोड टनल, अमेरिका : टोड हा एक प्रकारचा बेडूक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बेडकांसाठीही एक खास बोगदा बनवण्यात आला आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या डेव्हीस शहरात पोल लाईन रस्ता मार्गाच्या खालून हा बोगदा काढण्यात आला आहे.हा बोगदा सहा इंच रुंद आहे. वास्तविक हा रस्ता बनवताना बेडकांना रस्ता पार करताना अडचणी येत होत्या.त्यामुळे बेडकांना सुरक्षित रस्ता पार करता यावा,म्हणून टोड बोगद्याची निर्मिती करण्यात आली.


इकोफ्रेंडली एनिमल ब्रिज,भारत: आपल्या भारतातदेखील प्राण्यांसाठी एक पूल बांधण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातल्या कालाढूंगी-नैनीताल राज्य मार्गावर हा प्राणी ब्रिज बांधण्यात आला आहे. वास्तविक हा मार्ग जंगलातून जातो.छोटे प्राणी अचानक वाहनांसमोर येऊन अपघात घडण्याच्या घटना होत घडत होत्या.त्यामुळे हा पूल रस्त्याच्या 40 फूट वर बांधण्यात आला आहे. हा पूल 90 फूट लांब आणि पाच फूट रुंद आहे. विशेष म्हणजे हा पूल इकोफ्रेंडली आहे.कारण हा पूल बांबू आणि गवतांपासून बनवण्यात आला आहे. प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुलावर चार कॅमेरेही लावण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment: