Sunday 9 May 2021

बेरोजगारीचे संकट


'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' ही देशातील अग्रगण्य आर्थिक अध्ययन संस्था आहे. सरकार त्यांची माहिती गांभीर्याने घेत असते. एप्रिल-2021 महिन्यातील रोजगार आघाडीवरील एकंदर परिस्थितीची माहिती देणारा त्यांचा ताजा अहवाल चिंताजनक असाच आहे. जानेवारी ते एप्रिल-2021 या चार महिन्यातील बेकारीच्या गतीचे किंवा दराचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेल्याचे पाहणीत आढळले आहे. या चार महिन्यातील बेकारांची संख्या 99 लाखांनी वाढल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तसेच आठ टक्के वाढीचे प्रमाणही आतापर्यंतचे उच्चांकी आहे. एकट्या एप्रिलमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसणारे चित्र भयंकर आहे. या महिन्यात बेकारांची संख्या जवळपास 73.5 लाखांनी वाढल्याचे ‘सीएमआयई़'ला आढळले आहे. संस्थेच्या पाहणीनुसार, गेल्या वर्षीच्या कोरोना साथीमुळे उद्योग-व्यावसायिकांनी आधीच नोकरकपात करून मर्यादित कर्मचारीवर्ग राखला आहे. आता दुसऱ्या उद्रेकामुळे जर याच्या पुढे जाऊन नोकरकपात होत असेल तर ती स्थिती उत्पादनचक्र थांबण्याच्या दिशेने आहे, असा अर्थ लावावा लागेल. नव्याने नोकरभरती जवळपास नावापुरतीच आहे आणि अर्थव्यवस्थेने थोडीफार गती पकडली तरी त्या स्थितीत फारशी सुधारणा होण्याची शक्‍यता नाही.अगदी नियमित क्षेत्रापासून ते अगदी किरकोळीच्या किंवा असंघटित आणि घरगुती उद्योगव्यवसाय क्षेत्रही त्यात समाविष्ट आहे. आतिथ्य क्षेत्र, हॉटेल, पर्यटन या क्षेत्रातली रोजगार हानी प्रचंडच आहे. या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या सह-क्षेत्रांमध्येही या बेकारीचे पडसाद उमटले आहेत. सेवाक्षेत्राचा विचार केल्यास घरगुती उद्योग आणि किरकोळ नोकऱ्या करून उपजीविका करणारे या उद्रेकाचे प्रमुख बळी ठरले आहेत. मागणी आणि खपाचे चक्र जवळपास थांबलेच असेल तर त्याची थेट परिणिती उद्योग-व्यवसाय बंद होण्यातच होऊ शकते. आकडेवारीनुसार, गृहोपयोगी वस्तू व उपकरणे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, वाहने यांच्या विक्रीत एप्रिल महिन्यात मोठी घट नोंदली आहे. घरगुती उपकरणाचा खप 16.5 टक्‍क्‍यांनी, वाहने दहा आणि किराणा साडेबारा टक्के अशी घट आहे.काही अर्थतज्ञांनी या परिस्थितीमुळे नोकऱ्या गमावलेल्यांकडून समाजविघातक आणि उपद्रवी कारवाया सुरू होणे, चोऱ्यामाऱ्या वाढणे असे प्रकार वाढू शकतात. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा पेच उद्‌भवू शकतो, असा इशाराही दिलाय.

No comments:

Post a Comment