Sunday 9 May 2021

कॅनडाविषयी जाणून घ्या


•'यूएसन्ज ॲँड वर्ल्ड रिपोर्ट’ या संस्थेनं ‘बीएव्ही ग्रुप’ आणि ‘व्हार्टन विद्यापीठा’च्या संयुक्त विद्यमाने २०२१ मधल्या सर्वोत्कृष्ट देशांच्या रॅँकिंगविषयीचा अहवाल नुकताच, म्हणजे ता. १३ एप्रिल 2021रोजी जाहीर केला आहे. सन २०१६ पासून नियमितपणे ७८ देशांचं सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणात चपळता (Agility), उद्योजकता (Entrepreneurship), जीवनविषयक गुणवत्ता (Quality of Life), मूव्हर्स (Movers), सामाजिक उद्देश (Social Purpose), सांस्कृतिक प्रभाव (Cultural Influence), व्यवसायासाठी प्रोत्साहन (Open for Business), सत्ता (Power), साहस (Adventure) व वारसा (Heritage) अशा मापदंडांचा समावेश आहे. या रॅंकिंगनुसार ‘एकूणच सर्वोत्कृष्ट देश’चा किताब या वर्षी कॅनडानं पटकावला आहे. सन २०१६ मध्ये पहिला क्रमांक जर्मनीनं मिळवला होता, तर सन २०१७ ते २०२० मध्ये सलग चार वर्षं हा पहिल्या क्रमांकाचा किताब स्वित्झर्लंडकडे होता. भारत या यादीत सलग दोन वर्षं २५ व्या क्रमांकावर आहे.

•ओटावा ही या देशाची राजधानी असून लोकसंख्या आहे तीन कोटी ७६ लाख. इंग्लिश व फ्रेंच या प्रमुख भाषा आहेत. ९० टक्के लोकसंख्या ही अमेरिकी सीमांच्या सरासरी १०० किलोमीटर अंतरावर वास्तव्य करते. कॅनडामध्ये बहुसांस्कृतिक समाज राहतो, ज्यात ब्रिटिश, फ्रेंच, आशियाई आणि जगातील जवळपास सर्व ठिकाणचे लोक कमी-अधिक प्रमाणात राहतात. ‘इंडो-कॅनेडियन’ लोकसंख्येचा विचार केला तर १४ लाख लोक तिथं आहेत. म्हणजेच भारतीय वंशाचे किंवा भारतीय असे एकूण लोकसंखेच्या चार टक्के लोक तिथं आहेत, या चार टक्क्यांपैकी दोन टक्के लोक पंजाबी आहेत. बहुसंख्य भारतीय हे टोरांटोत राहतात. कॅनडामध्ये कुठंही मोकळंढाकळं जगता येतं हे त्या देशाचं वैशिष्ट्य. कॅनडानं स्वत:ची प्रतिष्ठा जपत एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे.

•कॅनडा हा देश अतिशय मोठा असून निसर्गसौंदर्याची समृद्ध अशी ती भूमी आहे. तिथं सर्व ऋतू अनुभवता येतात. अत्यंत विकसित, प्रगत अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान तिथं आहे. मानवी विकास निर्देशांकही जास्त असणाऱ्या अशा देशात एकदा जायलाच हवं.

•युकॉनमधील क्लुआने नॅशनल पार्कच्या हिमनदीपासून ते नोव्हा स्कॉशियाच्या केप ब्रेटन हायलॅंडपर्यंतचं तिथलं नैसर्गिक सौंदर्य आफाट आहे. ज्याला आपल्याकडे ग्रामीण भाग असं म्हटलं जातं तशी तिकडची ‘कंट्रीसाईड’ तर भन्नाट आहेच;

•नायगारा धबधब्याचे नयनरम्य दृश्य, व्हिसलरचा पर्फेक्ट स्की स्पॉट, जागतिक वारसास्थळांच्या यादीतलं क्यूबेक हे ‘ओल्ड टाउन’, जलक्रीडाप्रेमींचं टोफिनो, रात्री सुंदर दिसणारी टोरांटोची स्कायलाइन, बे ऑफ फंडी, कॅपिलिनोचा हलता पूल, बॅंफ राष्ट्रीय उद्यान, प्रिन्स एडवर्ड आयलंड, व्हॅंकुव्हर शहर... अशी ‘एक से बढ़कर एक’ पर्यटनस्थळं कॅनडात आहेत. काळ्या व ग्रिझली अस्वलांसह इतर वन्य प्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे. ट्रेकिंगसाठी व इतर साहसी खेळांसाठीही बरीच ठिकाणं आहेत. ब्रिटिश कोलंबियन नानिमो शहरात दरवर्षी ‘बाथटबची शर्यत’ असते. ठरवून दिलेलं अंतर बाथटबपासून तयार केलेल्या बोटींमधून वेगानं पार करायचं असतं. विविध प्रकारच्या वाईन्स, समुद्री खाद्य, फ्रेंच पदार्थ ‘पुतीन’ व ‘मेपल सरबत’ हा तिथल्या दैनंदिन खाद्यसंस्कृतीचा भाग आहे.

No comments:

Post a Comment